top of page
Search

मेथीचे फायदे आणि नुकसान

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • May 17, 2021
  • 4 min read

मेथी अत्यंत गुणकारी मानली जाते. आपल्याला केवळ मधुमेहासाठी होणारा अथवा जेवणासाठी वापरण्यात येण्याचा फायदा माहीत आहे. पण त्याचे इतर फायदे आणि नुकसान काय आहेत ते जाणून घेऊया. केवळ मेथीच नाही तर याचे बीसुद्धा खूप उपयोगी आहे. संपूर्ण भारतात मेथीदाण्यांचे सेवन केले जाते.





1) मेथीदाणे अॅनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत.

2) एक चमचा मेथीदाणे पाण्यासोबत घेतल्यास अपचनाची समस्या दूर होते.

3) मेथीचे दाणे आर्थरायटीस आणि साईटिका समस्यांवर रामबाण उपाय आहेत. सुमारे एक ग्राम मेथीदाण्यांची पावडर आणि सुंठ पावडर यांचे मिश्रण गरम पाण्यातून दिवसभर दोन-तीन वेळा घेतल्याने लाभ होतो.

4) केसांमध्ये कोंडा झाला असेल तर मेथीच्या दाण्यांची पेस्ट डोक्याला लावा. त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवा. सुती कापडाने पुसा. कोंडा दूर होईल.

5) केस गळत असतील तर मेथीची भाजी खावी आणि त्याचबरोबर रोज एक चमचा मेथीच्या दाण्यांचं पाणी प्यावं. यामुळे केसगळतीची समस्या दूर होते. त्याशिवाय तुम्ही मेथीचे दाणे वा पानं मिक्सरमधून काढून त्याची पेस्ट करा आणि ती केसांना लावा, सुकल्यानंतर केस धुवा. यामुळेदेखील केसगळती थांबते.

6) केसांना घनदाट आणि मजबूत करण्यासाठी तुम्ही नारळाच्या दूथात 2 चमचे मेथी दाण्याची पावडर मिसळा. ही पेस्ट डोक्यावर आणि केसांना लावा आणि 30 मिनिट्सनंतर केस शँपूने धुऊन घ्या. यामुळे केस घनदाट आणि मजबूत होतील. चांगल्या परिणामासाठी असं आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी करा.

7) केस जर कोरडे असतील तर चार मोठे चमचे दही घ्या त्यामध्ये तीन चमचे मेथी दाणे वाटून घाला आणि अर्धा तास भिजवून ठेवा. आता ही पेस्ट केसांना लावा आणि अर्धा तास तसंच ठेऊन द्या. नंतर शँपूने केस धुवा. यामुळे तुमच्या केसांतील कोरडेपणा दूर होईल आणि केस अधिक मुलायम होतील. तसंच अजून एक उपाय म्हणजे, तुम्ही 4 चमचे मेथी पावडर घ्या त्यामध्ये 1 लिंबाचा रस आणि 1 वाटलेलं केळ मिक्स करा. आता ही पेस्ट तुमच्या केसांवर लाऊन सुकू द्या आणि मग नंतर केस व्यवस्थित धुऊन घ्या. यामुळेदेखील तुमचे केस मुलायम आणि चमकदार होतील.

8) मेथी आणि सुंठ समान प्रमाणात घेऊन चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये गुळ टाकून खाल्ल्यास संधिवाताची समस्या दूर होण्यास मदत होईल.

9) मेथीदाणे रात्रभर नारळाच्या गरम तेलात भिजवून ठेवा. सकाळी या तेलाने डोक्याला मसाज करा. हळू-हळू केस गळणे बंद होईल.

10) पोटातील गॅस आणि छातीतील कफ दूर करण्यासाठी मेथी रामबाण औषधीचे काम करते. दररोज 5 ग्रॅम मेथीचे चूर्ण सकाळ-संध्याकाळ खाल्ल्याने वात रोग दूर होतात.

11) मेथीदाण्यामध्ये असलेले भरपूर फायबर आणि स्टेरॉइड दोन पद्धतीने काम करतात. एक म्हणजे शरीरात इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवतात. याची मधुमेह्यांसाठी खूप गरज भासते. तुम्हाला एक चमचा मेथी दाणे एका ग्लासात रात्रभर पाण्यात भिजत घालून झाकून ठेवायचं आहे. सकाळी हे पाणी तुम्ही रिकाम्या पोटी प्या. रोज हे प्यायल्याने तुमचा मधुमेह नियंत्रित होण्यास मदत होते. दुसरे म्हणजे यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रित राहतो. सोबतच मेथी दाण्यांमुळे प्रतिकारशक्तीतही वाढ होते. कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज रुग्णांसाठी हे अमृतसमान आहेत.

12) उच्चरक्तदाब कमी करण्यासाठी मेथीचे दाणे खूपच फायदेशीर ठरतात. अर्धा चमचा मेथीचा दाणा घ्या. त्या रात्रभर गरम पाण्यात भिजवा. सकाळी उठून हे पाणी पिऊन घ्या आणि मेथीचे दाणे चाऊन खाऊन टाका. याने उच्च रक्तदाब लवकरच कमी होईल. तसंच हृदय रोग कमी होण्यासाठीदेखील याची मदत होते, हे हृदयातील रक्तप्रवाह नियमित करून हृदय निरोगी बनवतं आणि ब्लड क्लॉट होण्यापासूनही वाचवतं. याचं सेवन करण्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा मेथी दाणे घ्या. ते उकळून पाणी गाळून घ्या आणि मग त्यामध्ये आपल्या स्वादानुसार मध घाला. मध घातल्यामुळे मेथीचा कडूपणा थोडा कमी होईल तसंच हे पिण्यासाठी सोपं होईल. हे रोज पिण्यामुळे तुम्हाला फायदा होईल.

13) मेथीदाण्याचे नियमित सेवन केल्यास वजन कमी करण्यास आणि हार्मोन संतुलित राहण्यास मदत होते. दररोज तीन ग्रॅम मेथीदाण्याचे सेवन महिलांसाठी लाभदायक ठरते.

14) अपचन किंवा बद्धकोष्ठता झाल्यास अर्धा चमचा मेथीदाणे पाण्यासोबत घ्यावेत. थोडेसे मेथीदाणे सकाळ-संध्याकाळ पाण्यातून घेतल्यास बद्धकोष्ठतेची समस्या नष्ट होऊ शकते.

15) मेथीदाण्याची पावडरची पेस्ट तयार करून त्वचेवर लावल्यास जळाल्याचे व्रण दूर होण्यास मदत होईल.

16) पोटदुखीसाठी एक चमचा मेथी दाणे तव्यावर भाजून गरम पाण्याबरोबर घ्या. तुमची पोटदुखी बंद होईल. 17) बाळाला स्तनपान करत असाल तर शरीरामध्ये दूध कमी येण्याची समस्या बऱ्याच महिलांना येते. एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मेथीचे दाणे रात्रभर भिजत ठेवायचे आहेत. त्यानंतर सकाळी मेथीचे हे दाणे तसेच ठेऊन पाणी उकळून घ्या. हे पाणी प्या. असं रोज केल्यामुळे महिलांच्या स्तनांमध्ये दूधाची वाढ होते. हे शरीरामध्ये दूध तयार करण्यासाठी मदत करतं. यामधील असणारे विटामिन्स आणि मॅग्नेशियमचे गुण शरीरात दूध अधिक निर्माण करण्यास मदत करतात.

18) रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात मेथी पावडर मिसळून ते प्या. सकाळी तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही.

19) त्वचेवरील सुरकुत्या, डाग कमी करण्यासाठी मेथीची पानं वाटून त्याचा लेप चेहऱ्यावर लावल्यास, तुमच्या चेहऱ्यावरील डाग निघून जाण्यास मदत होते. तसंच त्वचेमध्ये तजेलदारपणा टिकून राहतो.

20) मेथीचे दाणे तुमच्या त्वचेला चांगलं मॉईस्चराईज करून त्यातील कोरडेपणा दूर करतात. त्यासाठी तुम्ही एक चमचा मेथी पावडरमध्ये थोडंसं दही घालून जाड पेस्ट बनवून घ्या. ती तुमच्या चेहऱ्याला लावा. नंतर साधारण 30 मिनिट्सनंतर ही पेस्ट हाताने स्क्रब करत काढा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाईल. नंतर तुम्ही चेहरा थंड पाण्याने धुवा. थंडी असल्यास, चेहरा धुण्यासाठी तुम्ही कोमट पाणीदेखील वापरू शकता. असं आठवड्यातून एक वेळ केल्यास तुम्हाला चांगला परिणाम दिसेल.

21) शरीराची त्वचा मुलायम बनवण्यासाठी मेथीच्या पानांचा रस काढून त्यात लिंबाचा रस मिसळून हे मिश्रण त्वचेवर लावा. पिंपल्सपासून सुटका मिळवायची असल्यास, आंघोळ करण्यापूर्वी अर्धा तास मेथीची पानं मिक्सरमधून वाटून लेप करा आणि तो चेहऱ्यावर लावा. त्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स निघून जातात आणि लवकर परत येत नाहीत.


मेथीने काय होतं नुकसान मेथीचे दाणे शरीरासाठी गरम असतात, त्यामुळे याचं अधिक प्रमाणात सेवन केल्यास, पोटात जंत होण्याची शक्यता असते. कडू ढेकर, पोटात सूज असे प्रकार उद्भवू शकतात. त्यामुळे योग्य प्रमाणातच मेथी खायला हवी. गरोदर असताना मेथी अजिबात खाऊ नका. यामुळे इंटरनल ब्लिडिंग होण्याची शक्यता असते.


टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


Dr. Divya Prakash Pawar BAMS, MS (Gynaecology And Obstetrics) DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)] PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services) DDN (Diploma In Diet And Nutrition) MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page