top of page
Search

मध

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • Oct 7, 2021
  • 3 min read

आयुर्वेदात हे मध अमृतच मानला गेला आहे. मध लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी तितकाच फायदेशीर आहे. नियमितपणे मध खाल्ल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे अनेक प्रकारचे संसर्गजन्य रोग जसं की सर्दी आणि खोकला होत नाहीत.

  1. जर तुमचा खोकला कित्येक दिवस बरा होत नसेल तर तुम्ही मध वापरू शकता. मधात असलेले बॅक्टेरियाच्या वाढीला रोखणारा पदार्थ इन्फेक्शन होऊ देत नाही. मध कफ पातळ करतो. कफ पातळ झाला की कफ सहज पडून जातो. जे कोरड्या खोकल्याने त्रासलेले आहेत, त्यांनी मध खा. खोकल्यापासून आराम पडण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मध कोमट पाण्यात मिसळून प्या. दुसरं म्हणजे आलं आणि मध घालून तयार केलेलं चाटण खोकला बरा करतं.

  2. मधात खूप जास्त अँटिऑक्सिडंट्सचं असतात. अँटीऑक्सिडंट्स हृदयासाठी खूप फायदेशीर असतात आणि हृदयाशी संबंधित अनेक प्रकारच्या आजारांपासून ते आपलं संरक्षण करतात. या व्यतिरिक्त, मध शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतो. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रोज एक ते दोन चमचे मध कोमट दुधात मिसळून प्या. दुधात मध मिसळून प्यायल्याने सर्दी, खोकला, ताप असे लहानसहान आजार दूर राहतात.

  3. मधाचा आणखी एक फायदा म्हणजे घसा खवखवत असेल तर बरा होतो. जर घसा खवखवत असेल तर एक चमचा आल्याच्या रसात एक ते दोन चमचे मध मिसळा आणि दिवसातून दोनदा घ्या.

  4. जर संडासला साफ होत नसेल म्हणजेच बद्धकोष्ठता असेल तर बऱ्याच आजारांना आयातं आमंत्रण मिळतं. म्हणून बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी आणि पोट साफ होण्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधात एक चमचा मध मिसळून प्या.

  5. जर तुम्ही वजन वाढल्याने किंवा लठ्ठपणामुळे निराश झाला असाल तर अगदी नियमित रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध मिसळून रिकाम्या पोटी घ्या. त्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ नका. ह्यात तुम्ही अर्ध्या लिंबाचा रसही मिसळा. मधात चरबी नसते. वजन नियंत्रित करण्याबरोबरच मध शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी देखील कमी करतो.

  6. मधाचे फायदे केवळ पचन आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यापुरते मर्यादित नाहीत बरं का ! तर मधात असे गुणधर्म असतात जे त्वचा उजळ आणि निरोगी बनवतात. त्वचा कोरडी झाली असेल तर एक चमचा मध घ्या आणि त्वचेच्या कोरड्या भागावर लावा. 15-20 मिनिटे सुकू द्या आणि नंतर थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून किमान तीन वेळा हा उपाय करा.

  7. त्वचेवर ग्लो हवा असेल तर चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी मधाने तयार केलेला फेस पॅक वापरा. मध आणि लिंबू, मध आणि दूध, मध आणि केळी आणि मध आणि दही असे केलेले फेस पॅक अधिक फायदेशीर असतात. मुरूम आली असतील तर चेहऱ्याला रात्री मध लावून सकाळी धुवून टाका.

  8. त्वचा कापली किंवा भाजली असेल तर त्यावर मध लावा. मध खूप फायदेशीर आहे. मधात असलेले अँटिसेप्टिक गुणधर्म जळजळ लवकर बरी करतात आणि त्वचेला संसर्गापासून वाचवतात.

  9. केस कोरडे झाल्यामुळे केस झपाट्याने गळू लागतात. मधाचा वापर केसांचं सौंदर्य वाढवतो आणि त्यांचा कोरडेपणा कमी करतो. मधात असलेले अँटीऑक्सिडंट गुणधर्म केसांसाठी फायदेशीर असतात. दही मध मिसळून हेअर मास्क बनवा आणि केसांना लावा. ह्याने खराब झालेल्या केसांना पोषण मिळेल. मध आणि अंड्यांपासून बनवलेला हेअर मास्क खराब झालेले केस निरोगी करतो. मध आणि कोरफड लावाल तर केस लांब वाढतात.


  • मधाचा वापर फार पूर्वीपासून आपल्या आहारात केला जातो आणि औषध म्हणूनही केला जातो. आयुर्वेदातही मधाचे फायदे ठळकपणे नमूद केले आहेत. मध म्हणजे मधमाशांनी फुलांमधून तयार केलेलं अमृत आहे कारण मध माणसांसाठी एक बऱ्याच रोगावर गुणकारी औषध आहे. सर्वत्र मधाला औषधाचा दर्जा प्राप्त झाला आहे आणि आता जगभरातील लोकांनी गोडपणासाठी साखरे ऐवजी मध वापरायला सुरुवात केली आहे.

  • मध हा आवश्यक पोषक, खनिजे आणि जीवनसत्वांचं भांडार आहे. मधात फ्रक्टोज असतात. ह्याशिवाय कार्बोहायड्रेट्स, रिबोफ्लेविन, नियासिन, व्हिटॅमिन बी -6, व्हिटॅमिन सी आणि एमिनो ॲसिड देखील यात आढळतात. एक चमचा म्हणजे 21 ग्रॅम मधात सुमारे 64 कॅलरीज आणि 17 ग्रॅम साखर म्हणजेच फ्रुक्टोज, ग्लुकोज, सुक्रोज आणि माल्टोज असते. पण मधात चरबी, फायबर आणि प्रोटीन्स नसतात. दिवसभरात एक ते दोन चमचे मध पुरेसा आहे आणि इतर आजार असल्यास शक्यतो डॉक्टरांनी सांगितलेल्यानुसार वापरा. एक वर्षाखालील मुलाला मध देऊ नका.

  • ॲलर्जी असलेल्या लोकांनी मध घेऊ नये. संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांनी वापरुन बघा आणि ठरवा. डायबिटीस च्या रुग्णांनी मध सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ब्लड प्रेशर असेल तर दररोज मध खाताना तुमचा रक्तदाब तपासत रहा. तुपासह मध समान प्रमाणात घेऊ नका. गर्भधारणेदरम्यान आणि स्तनपानादरम्यान मध कमी प्रमाणात घ्या. उकळत्या गरम पाण्यात मध टाकून पिऊ नका.


टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page