मासिक पाळीचा त्रास कमी होण्यासाठी ‘ही’ आसने उपयुक्त
- divipawar94
- Nov 27, 2022
- 3 min read

मासिक पाळी ही अनेक स्त्रियांना त्रासदायक वाटते. काही मुली आणि स्त्रियांना या पाळीचा इतका त्रास होतो की ती कधी एकदा संपते असे होऊन जाते. पाळीच्या आधी ५ ते ७ दिवसांपासून दुखणारी कंबर आणि पाय यांमुळे स्त्रिया फारच थकून जातात. स्त्रीची ताकद असणारी ही पाळी कधी एकदा बंद होते असेही अनेकींना वाटून जाते. मग हा त्रास कमी व्हावा यासाठी कधी पेन किलर घेतल्या जातात तर कधी इतका त्रास होतो की डॉक्टरांकडेच जाण्याची वेळ येते. पण काही योगासने केल्यास हा त्रास कमी होण्याची शक्यता असते. आपल्यातील अनेकांना योगासनांबाबत माहीती असली तरी पाळीचा त्रास कमी होणारी विशिष्ट आसने माहीत नसतात, काही खास आसने पाहूयात...
1) पवनमुक्तासन
मासिक पाळीमध्ये काही स्त्रियांना गॅस, अपचनाच्या समस्यांचाही त्रास सहन करावा लागतो. यासाठी तुम्ही पवनमुक्तासनाचा सराव करू शकता. या आसनामुळे पोटातील वायू मुक्त होण्यास मदत मिळते. तसंच कंबर, पोट, ओटीपोट आणि मानेच्या स्नायूंचाही चांगला व्यायाम होतो.
कसे करावे आसन?
सर्वप्रथम योग मॅट घ्या आणि पाठीवर झोपा. दोन्ही पाय जवळ आणा. तुमचे दोन्ही हात शरीराजवळ ठेवावे. आता दोन्ही पाय एकत्रित ३० ते ४५ अंशांपर्यंत वर उचलावे. यानंतर पाय गुडघ्यात मोडा आणि छातीजवळ आणा. दोन्ही हातांच्या बोटांची गुंफण करा आणि गुडघ्यांना पोटावर दाबा. पोटावर जास्त ताण येणार नाही याची काळजी घ्यावी. आता मान वर उचला आणि हनुवटीनं गुडघ्यांना स्पर्श करा. ही आहे पवनमुक्तासनाची अंतिम स्थिती. तुम्हाला दोन्ही पाय छातीजवळ आणणं कठीण जात असल्यास तुम्ही एका वेळेस एका पायानं सराव करू शकता.
2) अर्ध पवनमुक्तासन
पाठीवर झोपा. उजवा पाय गुडघ्यात वाकवून गुडघा दोन्ही हातांनी धरुन छातीजवळ आणायचा प्रयत्न करा. तुम्हाला आरामदायी वाटत असेल तर डावा पाय ताणण्याचा प्रयत्न करा. हेच दोन्ही पायाने करा. यामुळे पायात येणाऱ्या गोळ्यांपासून आराम मिळण्यास मदत होईल.
3) मार्जरासन
आपण लहान मुलांना घोडा घोडा करतो त्या स्थितीत या. हात आणि गुडघे जमिनीला टेकलेले आणि एकमेकांना समांतर राहतील असे बघा. त्यानंतर श्वास घेऊन चेहरा वरच्या दिशेला नेण्याचा प्रयत्न करा. मग श्वास सोडत हनुवटी खाली नेत छातीला टेकवण्याचा प्रयत्न करा. यामध्ये एकदा कंबर खाली जाईल आणि एकदा वरच्या बाजूला जाईल. हे आसन किमान १० वेळा केल्यास तुमचा मासिक पाळीतील त्रास काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
4) वक्रासन
पाय पसरुन खाली बसा. उजवा पाय गुडघ्यातून दुमडून डाव्या पायाच्या पलिकडे गुडघ्यापाशी नेण्याचा प्रयत्न करा. जो पाय दुमडला आहे त्याच्या दुसऱ्या बाजूला हात नेण्याचा प्रयत्न करा. दुसरा हात मागच्या बाजूला जमिनीला समांतर ठेवा. यामुळे मासिक पा
ळीतील कंबरदुखी कमी होण्यास मदत होईल.
5) धनुरासन
पोट आणि कमरेवरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी हे आसन म्हणजे उत्तम उपाय आहे. यामुळे पोट, पाठ आणि कमरेचे स्नायू देखील मजबूत होतात. यामुळे पाठीचा कणा लवचिक होण्यास मदत मिळते.
कसे करावे आसन?
धनुरासन करण्यासाठी पोटावर झोपावे. कपाळ जमिनीवर ठेवा. दोन्ही पाय एकमेकांजवळ आणा. हात शरीराजवळ ठेवा. पाय गुडघ्यात दुमडा. आपल्याटाचा पार्श्वभागाच्या जवळ आणा. डोके वर उचलून हनुवटी जमिनीवर ठेवावी. उजव्या आणि डाव्या हातांनी अनुक्रमे उजव्या आणि डाव्या पायाचे घोटे धरावे. घोटे धरताना हातांची चार बोटे बाहेरील बाजूंस आणि अंगठा आतील बाजूस असावा. आता पाय आतील बाजूनं वर उचलण्यास सुरुवात करावी. हात कोपरात वाकवू नये. याच वेळेस डोके, छाती आणि शरीराचा खालचा भाग म्हणजे गुडघे आणि मांड्या आपोआप वर उचलले जातील. यामध्ये शरीराचा सर्व भार पोटावर येतो. ही आहे धनुरासनाची अंतिम स्थिती.
6) सेतु बंधासन
सेतु बंधासनामुळे शरीराची ऊर्जा वाढण्यास मदत होते. या आसनामुळे छातीचे स्नायू, मान आणि पाठीचा कण्याला चांगला ताण मिळतो. मासिक पाळीमध्ये त्रास होऊ नये यासाठी या आसनाचा सराव करावा.
कसे करावे आसन?
पाठीवर झोपा. पायाचे तळवे पार्श्वभागाजवळ घ्या. हाताने टाचा धरा. श्वास घेत शरीर कंबरेतून वर उचलण्याचा प्रयत्न करा. शक्य तितक्या वेळ या स्थितीत राहील्यानंतर श्वास सोडत शरीर पुन्हा जमिनीवर ठेवा. हे आसन १० वेळा करा. त्यामुळे पाठदुखीपासून आराम मिळेल.
7) बालासन
बालासनाच्या सरावामुळे मन शांत होण्यास मदत मिळते. यामुळे शरीरावरील ताणतणाव कमी होतो.
कसे करावे आसन?
सर्वांत आधी पाठ ताठ ठेऊन वज्रासनामध्ये बसा. दीर्घ श्वास घेत दोन्ही हात वरील दिशेनं सरळ वर उचला. आता कंबरेपासून ते डोक्यापर्यंतचा भाग जमिनीच्या दिशेनं खाली झुकवण्याचा प्रयत्न करा. जमिनीला कपाळानं स्पर्श करा. दोन्ही हातांना डोक्याच्या समोर आणून जमिनीवर ठेवा. ही आहे बालासनाची अंतिम स्थिती...
योग प्रशिक्षकाच्या देखरेखीखालीच योगासनांचा अभ्यास करावा. तसंच मासिक पाळीदरम्यान योगासने अथवा कोणत्याही प्रकारचा व्यायाम करणं टाळावे. मासिक पाळीमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी नियमित आसनांचा सराव करावा म्हणजे पाळी येण्यापूर्वी तसंच पाळी आल्यानंतर त्रास होणार नाही.
टीप - वरील कोणतेही उपचार स्त्रीरोग तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.
DR. DIVYA PRAKASH PAWAR – RATHOD
👉🏻 BAMS (Bachelor Of Ayurvedic Medicine And Surgery) [आयुर्वेद वाचस्पती]
👉🏻 MS (Gynaecology And Obstetrics) [स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्र तज्ञ]
👉🏻 DYT (Diploma In Yoga Teacher) [योग शिक्षिका]
👉🏻 PGDEMS (Post Graduate Diploma In Emergency Medical Services
[आपत्कालीन वैद्यकीय सेवा विशेषज्ञ]
👉🏻 DDN (Diploma In Diet And Nutrition) [आहार आणि पोषणतज्ञ]
👉🏻 MDPK (Master Diploma In Panchakarma) [पंचकर्म विशेषज्ञ]




Comments