top of page
Search

मासिक पाळी

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • Nov 27, 2022
  • 4 min read

मासिक पाळी म्हणजे काय?

मासिक पाळीला सुरुवात होणे हा प्रत्येक मुलीमधील महत्त्वपूर्ण बदल आहे. मासिक पाळीदरम्यान मुलीच्या गर्भाशयातून रक्तस्राव होत असतो. आपल्या शरीराला आवश्यक नसलेल्या उती (टिश्यु) या काळात बाहेर सोडल्या जातात. आपण शारीरिकदृष्ट्या परिपक्व होण्याचा एक भाग म्हणून या उती आणि काही प्रमाणात रक्त शरीराबाहेर सोडले जाते.


मुलींना मासिक पाळी कधी सुरू होते?

यौवनावस्थेत मुलींना पाळी येऊ लागते. हे चक्र साधारणपणे वयाच्या १२ ते १५ वर्षांच्या दरम्यान सुरू होते. बहुतेक वेळा मुलींना स्तनांचा विकास सुरू झाल्यानंतर सुमारे दोन वर्षांनी मासिक पाळी येणे सुरू होते. तसेच मासिक पाळी सुरू होण्याचे आणखी एक चिह्न म्हणजे अंतर्वस्रांवर आपण पाहू शकू किंवा जाणवू शकू असा द्रव पदार्थाचा स्राव. हा स्राव पहिली पाळी येण्यापूर्वी सुमारे सहा महिने ते एक वर्ष आधी सुरू होतो. काखेत आणि जांघेत केस येण्यास सुरुवात होणे हे मासिक पाळी सुरू होण्याचे संकेत असतात.

प्रत्येक मुलीचे शरीर वेगळे असते. त्यामुळे प्रत्येक मुलीला वेगवेगळ्या वयात मासिक पाळी येऊ शकते. साधारणतः १० ते १५ वर्षे वयात बहुतांश मुलींना पाळी येते. पाळी उशीरा सुरू होण्यामागे चिंतेचे कारण नसते. साधारणपणे वयाच्या १६ व्या वर्षापर्यंत मुलीची पाळी सुरू न झाल्यास स्री रोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते. तसेच स्तनाचा विकास, काख आणि जांघेतील केस विकसित होण्यास उशीर झाला असेल किंवा विकसित झाले नसतील तर अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच वयाच्या १४ व्या वर्षापर्यंत शरीराचा विकास होत नसेल तर स्त्रीरोग तज्ज्ञांना भेटण्याचा सल्ला दिला जातो.


मुलींना पाळी का येते?

मासिक पाळी चक्रावर तुमची पाळी येणे अवलंबून असते. त्यामुळे हे चक्र समजावून घेणे गरजेचे आहे. बाळाला जन्म देणे हा आपल्या जगण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. बाळाच्या संरक्षणासाठी शरीरात अनेक स्तर विकसित होत असतात. गरोदर राहण्यासाठी मासिक पाळी दर महिन्याला स्रीच्या शरीराला तयार करीत असते. साधारणपणे मासिक पाळीचे चक्र २८ दिवसांचे असून त्यात तीन टप्पे असतात.


पहिला टप्पा : हा असा टप्पा आहे जेथे रक्तस्राव होतो. साधारणतः हा कालावधी पाच ते सात दिवस असतो. या कालावधीत एंडोमेट्रिअल अस्तराची शेडिंग (बाळाचे संरक्षण करणाचे कवच) तयार केली जाते.


दुसरा टप्पा : हा तो काळ आहे ज्या दरम्यान संरक्षणात्मक गर्भाशय अस्तर तयार होते. ते साधारण सात दिवस टिकते.


तिसरा टप्पा : या काळात आपले गर्भाशय गर्भधारणा होण्याची प्रतीक्षा करते. जर गर्भधारणा झाली नाही तर संरक्षक अस्तर कमी होऊ लागते. शेवटी त्याचे शेडिंग होऊ लागते जेव्हा मासिक पाळीचे नवीन चक्र तयार होते.

तर थोडक्यात सांगायचे झाले तर, आपले शरीर दर महिन्याला गर्भधारणेची तयारी करते. आपल्या गर्भाशयाचे अस्तर बाळाच्या पालनपोषणाची आणि संरक्षणाची तयारी करण्यासाठी जाड होते. जेव्हा मासिक पाळी चक्रादरम्यान गर्भधारणा होत नाही तेव्हा आपल्या शरीराद्वारे तयार केलेले संरक्षक अस्तर दर महिन्याला मोकळे होते यालाच आपण मासिक पाळी म्हणतो. ही प्रक्रिया नवीन संरक्षणात्मक अस्तरासाठी मार्ग बनवते आणि आपण गर्भवती झाल्यास आपल्या बाळाचे संरक्षण करण्यासाठी तयार राहते. आयुष्यात ठराविक वेळी गर्भधारणा होऊ शकते. परंतु, आपल्या शरीराला हे माहीत नसते. त्यामुळे यासाठी शरीर दर महिन्याला तुम्हाला तयार करते. दर महिन्याला तुम्ही ज्या त्रासातून जाता तोच त्रास तुम्हाला ‘आई’ होण्याचा अंतिम आनंद देत असतो.



मासिक पाळी कधी येते?, तिचा कालावधी किती असतो?

मासिक पाळीचे सामान्य चक्र २८ दिवसांचे असते. त्यामुळे साधारणपणे चार ते पाच आठवड्यांनंतर म्हणजेच २८ दिवसांनंतर मासिक पाळी येते. मासिक पाळीचा कालावधी पाच ते सात दिवसांचा असतो. एखाद्या मुलीची मासिक पाळी सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे काही वर्षे ती नियमितपणे येत नाही. पाळीतील ही अनियमितता सुरुवातीचे काही दिवस मान्य करण्याजोगी असते. साधारण दोन ते तीन वर्षांनी मासिक पाळी सामान्य होऊन साधारण २८ दिवसांच्या अंतराने येते.


मासिक पाळीच्या काळात काय करावे?

सर्वप्रथम मासिक पाळी म्हणजे काय हे समजावून घ्या आणि त्याच्या लक्षणांबाबत जागरुक व्हा. पाळी सुरू झाल्यानंतर शरीरात अनेक बदल जाणवतात. तसेच काहीवेळा त्रासदेखील होतो. विशेषतः जेव्हा मासिक पाळी येण्यास नुकतीच सुरुवात झालेली असते तेव्हाचे ५ ते ७ दिवस त्रासदायक वाटू शकतात. या दिवसांत स्वतःची काळजी घेऊन हा कालावधी आरामदायी केला जाऊ शकतो. खालील काही गोष्टी यामध्ये करता येतात.

1. सकस आहाराचे सेवन करा. फळे, भाज्या यांचा आहारात समावेश करा आणि प्रक्रिया केलेले अन्न खाणे टाळा. मासे, चिकन, अंडी यांसारख्या प्रोटीनयुक्त आहाराचे सेवन करा.

2. पुरेशा सॅनिटरी पॅडचा साठा असू द्या. तसेच प्रवास करणार असल्यास किंवा बाहेर जात असल्यास काही सॅनिटरी पॅड पिशवीत असू द्या.

3. एखादी कॅरीबॅग किंवा कागदी बॅग सोबत असू द्या. जेणेकरून वापरलेल्या सॅनिटरी पॅडची विल्हेवाट लावणे सोपे होईल.

4. मासिक पाळी काळात भरपूर विश्रांती घ्या. या काळात थकवा अधिक प्रमाणात जावणू शकतो. चांगली विश्रांती घेतल्यास शरीर आणि मनाला तजेला मिळतो. रात्रीची झोप कमीत कमी आठ तासांची असू द्या. विशेषतः मासिक पाळी काळात झोप आणि आराम याकडे लक्ष द्या.

5. जर तुम्हाला काही वेदना होत असतील तर गरम पाण्याची पिशवी वापरा किंवा गरम पाण्याने अंघोळ करा.

6. कॅफिनचे सेवन करणे टाळा. कॅफिनमुळे पोटात त्रास जाणवू शकतो. या ऐवजी एक कप आल्याचा चहा किंवा ग्रीन टीचे सेवन करा.

7. कधीकधी अंथरुणावरून बाहेर पडण्याची इच्छा होत नाही. परंतु, अशावेळी घराबाहेर पडा आणि ताज्या हवेत फिरा. यामुळे मनाला तजेला मिळण्यासाठी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी मदत होईल.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळच्या व्यक्तीसोबत मोकळा संवाद साधा. मासिक पाळीदरम्यान होणार त्रास, या काळात येणारे अनुभव आपल्या आईला सांगा. तसेच एखाद्या जवळच्या मैत्रिणीशी याविषयी गप्पा करा. आपण या गोष्टीचा सामना करण्यासाठी सक्षम असतो. परंतु, कधीकधी आपल्या जवळच्या व्यक्तीसमोर भावना व्यक्त केल्याने आपल्याला फायदा होतो. तसेच मनावरील ताण कमी होण्यास मदत होते. मासिक पाळीबद्दल कोणतीही शंका किंवा अडचण असल्यास स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आपल्याला होणारा त्रास हा सामान्य असून यात लपवण्यासारखे काहीच नसते. प्रत्येक मुलीला वेगवेगळा त्रास जाणवतो इतकेच. . .



टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


DR. DIVYA PRAKASH PAWAR – RATHOD

👉🏻 BAMS (Bachelor Of Ayurvedic Medicine And Surgery) [आयुर्वेद वाचस्पती]

👉🏻 MS (Gynaecology And Obstetrics) [स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्र तज्ञ]

👉🏻 DYT (Diploma In Yoga Teacher) [योग शिक्षिका]

👉🏻 PGDEMS (Post Graduate Diploma In Emergency Medical Services

[आपत्कालीन वैद्यकीय सेवा विशेषज्ञ]

👉🏻 DDN (Diploma In Diet And Nutrition) [आहार आणि पोषणतज्ञ]

👉🏻 MDPK (Master Diploma In Panchakarma) [पंचकर्म विशेषज्ञ]

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page