गूळ
- divipawar94
- Jan 2, 2022
- 2 min read
अमेरिकेत नुकत्याच झालेल्या एका संशोधनावरून असा निष्कर्ष निघाला की जे लोक जास्त प्रमाणात साखरेचे सेवन करतात, त्यांना मोठ्या आतड्याचा कॅन्सर होण्याची अधिक शक्यता असते. कॅन्सरच नव्हे, तर साखर इतर अनेक रोगांचे कारणदेखील आहे. साखरेऐवजी रासायनिक मिश्रणरहित शुद्ध गुळाचा उपयोग स्वास्थ्यासाठी उत्तम आहे.
उसाच्या रसापासून साखर बनविण्याच्या प्रक्रियेत कॅल्शियम, लोहतत्त्व, गंधक (सल्फर), पोटॅशियम, फॉस्फरस इ. महत्त्वपूर्ण तत्त्वे नष्ट होतात, परंतु गुळात ही तत्त्वे तशीच असतात. गुळात प्रोटीन, मेद, कॅल्शियम, फॉस्फरस, कार्बोहायड्रेटस् व 'अ' जीवनसत्त्व असते.
औषधी-उपयोग:
पांडुरोग अथवा जास्त रक्तस्रावामुळे रक्तातील हिमोग्लोबीन कमी होते, तेव्हा लोहतत्त्वाच्या पूर्ततेसाठी पालकाचा प्रयोग केला जातो. पालकाच्या भाजीत १.३% व केळात ०.४% एम.जी. लोहतत्त्व असते, तर गुळात ११.४% एम.जी. लोहतत्त्व असते. महिलांमध्ये सामान्यपणे लोहतत्त्वाची उणीव आढळते. असे मासिकस्रावाच्या अनियमितपणामुळे होते. भाजके फुटाणे व गूळ खाऊन या उणीवेची पूर्तता करता येते. कोमट पाण्यात गूळ मिसळून रिकाम्या पोटी घेतल्यास विशेष लाभ होतो. हे मिश्रण दुपारच्या भोजनानंतर दोन तासांनीदेखील घेता येते.
गूळ चिक्कीच्या रूपातदेखील खूप प्रसिद्ध आहे. सालीसहित मुगाच्या शिजलेल्या डाळीत गूळ मिसळूनही खाऊ शकता. गुळात कॅल्शियम असल्यामुळे मुलांच्या हाडांची कमजोरी व दंतक्षयामध्ये गूळ खूप लाभदायक आहे. वाढत्या वयाच्या मुलांसाठी गूळ अमृततुल्य आहे.
गुळामध्ये 'ब' जीवनसत्त्वदेखील योग्य प्रमाणात असते. यात पँटोथिनिक अॅसीड, इनासिटोल सर्वोपरी असते, जे मानसिक स्वास्थ्यासाठी हितावह आहे. आयुर्वेदात तर लिहिलेले आहे की ताक, लोणी आणि गूळ खाणाऱ्याला म्हातारपण त्रास देत नाही. पोटॅशियम हृदयरोगात लाभदायक असते. हे गुळात मुबलक हे प्रमाणात असते. पोटॅशियम केळी व बटाट्यातसुद्धा आढळते. अधिक प्रमाणात साखरेचे सेवन हानिकारक आहे. गूळ, पिंडखजूर, बेदाणा, मनुका इ. मध्ये असलेली प्राकृतिक साखर लाभदायक असते. टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत. Dr. Divya Prakash Pawar BAMS, MS (Gynaecology And Obstetrics) DYT (Diploma In Yoga Teacher) [योग शिक्षिका] PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services) DDN (Diploma In Diet And Nutrition) MDPK (Master Diploma In Panchakarma)






Comments