top of page
Search

आयुर्वेदानुसार नव्या बाळंतिणीची देखभाल!

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • May 12, 2021
  • 2 min read

आयुर्वेदात सांगितलेल्या नियमांचे पालन करुन तुम्ही कोणत्याही परिस्थितीत निरोगी व सुदृढ राहू शकता. म्हणूनच आज आम्ही अशा काही आयुर्वेदिक टिप्स सांगणार आहोत ज्याच्या वापराने तुम्ही प्रेग्नेंसीमध्ये व डिलिव्हरीनंतर देखील एकदम फिट व सुदृढ राहू शकता. लोकांना वाटतं की स्त्रीची डिलिव्हरी झाली म्हणजे ती सर्व त्रासातून मुक्त झाली, आता तिला कसलाही त्रास वा वेदना होणार नाही. पण मंडळी हा समज चुकीचा आहे. गरोदरपणात स्त्री जेवढा त्रास भोगते तेवढाच त्रास तिला डिलिव्हरी नंतर देखील भोगावा लागू शकतो. त्यातही डिलिव्हरी जर नॉर्मल झाली असेल तर स्त्री एकवेळा लवकर बरी होते पण सिझेरियन डिलिव्हरी असेल तर त्या स्त्रीला अजून काही काळ अत्यंत वेदनेला सामोरे जावे लागते. अशा काळात स्त्रीची शक्य तितकी काळजी घेणे गरजेचे असते. या काळात थोडाही हलगर्जीपणा झाला तर तिचा त्रास अधिक वाढून तिच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो किंवा भयंकर शारीरिक व्याधी तिला विळखा घालू शकतात. आज आपण या लेखातून जाणून घेऊया की या काळात स्त्रीची काळजी कशी घ्यावी याबद्दल आयुर्वेदाने काय सांगितले आहे.

गरम पाण्याने अंघोळ

डिलिव्हरी नंतर स्त्रीला शारीरिक वेदना मोठ्या प्रमाणावर होत असतात. गरम पाण्याने अंघोळ केल्याने शारीरिक वेदना आणि तणाव कमी होतो. पोस्‍टपार्टमच नाही तर मासिक पाळी मध्ये सुद्धा पोटदुखी किंवा स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी गरम पाणी अत्यंत उपयोगी मानले जाते. यामुळे शरीर रिलॅक्स होते आणि डिलिव्हरी दरम्यान मारले गेलेले टाके भरण्यास सुद्धा मदत होते. अंघोळ झाल्यानंतर ज्या ठिकाणी टाके पडले आहेत ती जागा आरामात सुकवा, जेणेकरून त्यात संक्रमण वा पु बळावण्याच्या धोका राहणार नाही.

पोस्‍टपार्टम बेल्‍टचा वापर

आयुर्वेदाच्या अनुसार, पोस्‍टपार्टम बेल्‍ट परिधान केल्याने पोटाला मोठ्या प्रमाणात सपोर्ट मिळतो. डिलिव्हरी नंतर वात दोष वाढल्याने पोटात हवा भरते. आयुर्वेदाच्या मते पोस्‍टपार्टम बेल्‍टच्या मदतीने पोटाचा आकार कमी होण्यास खूप मदत होते. शिवाय पोटाचे स्नायू सुद्धा सैल होतात यामुळे मजबुती आणि संतुलन निर्माण होते. मात्र पोस्‍टपार्टम बेल्‍ट जास्त घट्ट बंधू नये कारण त्यामुळे कमरेच्या वेदना सुरु होऊ शकतात. त्यामुळे पोस्‍टपार्टम बेल्‍ट परिधान करताना हि एक काळजी अवश्य घ्यावी.

तेलाने अंघोळ

डिलिव्हरी नंतर स्त्रीने तेलाने अंघोळ करणे गरजेचे मानले जाते. एवढेच नाही तर हळूहळू शरीर पूर्वपदावर आल्यानंतर सुद्धा एक दोन वेळा तेलाने अंघोळ अवश्य करावी. यामुळे स्नायू आणि हाडांना मजबूती मिळते आणि त्वचेला सुद्धा तेज प्राप्त होते शिवाय शरीराला पोषण सुद्धा मिळते. तेल मालिश केल्यानंतर गरम पाण्याने अंघोळ केल्याने पूर्ण शरीराला ताकद मिळते. नारळ तेलाने रोज मालिश केल्याने हळूहळू स्ट्रेच मार्क्स सुद्धा गायब होतात आणि रखरखीत त्वचेला पोषण मिळते.

भरपूर आराम करा

डिलिव्हरी नंतर स्त्रीचे शरीर कमजोर होऊन जाते आणि या स्थितीमध्ये त्यांना बाळाला दूध पाजायचे असते. डिलिव्हरी नंतर सुरुवातीच्या महिन्यांमध्ये तर नीट झोप सुद्धा मिळत नाही आणि झोप न मिळाल्याने तणाव निर्माण होतो, सतत चिडचिड होते. अशावेळी स्त्रीने बाळ झोपले की आपली सुद्धा झोप अवश्य पूर्ण करावी. अनेक स्त्रिया या काळात काम सुद्धा करतात, पण हि गोष्ट अत्यंत घातक आहे कारण शरीर अतिशय कमजोर असते. त्यामुळे स्त्रीने शक्य तितका आराम करावा आणि पूर्ण बरे झाल्यावरच घरची जबाबदारी हातात घ्यावी.

आयुर्वेदानुसार डायट कसे हवे?

स्त्रीने आपल्या डायट मध्ये हळद, आले, धणे, जीरा आणि बडीशोप यांचा समावेश करावा. या काळात जास्त डाळ खाऊ नये कारण यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होऊ शकते. या काळात स्त्रीला आणि बाळाला कॅल्शियमची सर्वात जास्त गरज असते म्हणून दिवसातून दोन ते तीन ग्लास दुध न विसरता प्यावे. तूप आणि पालेभाज्या जास्तीत जास्त खाव्यात आणि अधिकाधिक पाणी प्यावे. या गोष्टी स्त्रीने आपल्या डायट मध्ये पाळल्या तर तिला डिलिव्हरी नंतरच्या काळात खूप लाभ होऊ शकतात. या नाजूक काळात जी स्त्री आपल्या आहारावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करते तिचे शरीर लवकरात लवकर पूर्ववत होते व ती आपले जीवन सामान्य स्त्री प्रमाणे जगू शकते.



 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page