आयुर्वेदिक दिनचर्या (Ayurvedic Daily Routine)
- divipawar94
- Nov 21, 2022
- 4 min read

संस्कृतमध्ये ‘दिनचर्या’ म्हणजे नित्यक्रम. दिन म्हणजे दिवस आणि आचर्य म्हणजे ठरल्या प्रमाणे करणे. दिनचर्या म्हणजे निसर्ग चक्र विचारात घेऊन केलेले आदर्श वेळापत्रक. आयुर्वेदात पहाटेच्या वेळाला महत्व आहे कारण तुमचा दिवसभराचा सूर या काळात ठरतो. आयुर्वेदा चा विश्वास आहे की ठराविक नित्यक्रम पाळणे ही शरिर आणि मन दोन्हीसाठी शिस्त आहे त्याने प्रतिकार शक्ती वाढते आणि शरीरातील अनावश्यक गोष्टी बाहेर टाकल्या जातात. साध्या आणि आरोग्यदायी नित्यक्रमामुळे शरिर आणि मन स्वच्छ राखले जाते, दोषांचे संतुलन होते, प्रतिकारशक्ती वाढते आणि दिवसाची सुरवात ताजीतवानी आणि उत्साहात होते. खालीलप्रमाणे सकाळच्या वेळेचा साधा नित्यक्रम पाळल्यास दिवसाची सुरवात आनंदाने होईल. ताजीतवानी सकाळ होण्यासाठी खाली काही सूचना दिल्या आहेत.
1. ब्रम्ह मुहूर्त
2. श्वासाची शक्ती
3. सकारात्मक लहरी
4. संरक्षक मंत्र
5. सकारात्मक पाऊल
6. स्वच्छ व्हा
7. व्यायाम आणि ध्यान करा
8. स्वत:चे लाड करा
9. योग्य प्रकारे स्नान
10.दुपारची वेळ
11.तिन्हीसांजेची वेळ
12.रात्रीचे जेवण
13.झोपण्याची वेळ
१. ब्रम्ह मुहूर्त | Brahma muhurata
सूर्योदयाच्या अगोदर साधारण दीड तास अगोदर उठावे म्हणजे सूर्याच्या गतीशी एकरूप होता येते. आयुर्वेदानुसार सकाळी उठण्यासाठी एक शुभ मुहूर्त सांगितला आहे – ब्रम्ह मुहूर्त म्हणजेच ब्रम्हाची – शुद्ध चेतनेची वेळ. सूर्योदयाच्या एक तास आधी वातावरणात एक छान ऊर्जा भरून राहिलेली असते. मग सूर्योदयाच्या अर्धा तास आधी वातावरणात आणखी एक उर्जेचा भर येतो. अशा, स्फूर्ती अशा गोष्टी या काळात उभारून येतात. ब्रह्मज्ञान (ध्यान आणि चिंतन), सर्वोच्च ज्ञान आणि चिरंतन आनंद मिळविण्यासाठी हा काळ उत्तम समजला जातो.या काळात वातावरण शुद्ध, शांत आणि मन शांत करणारे असते आणि मनही झोपे नंतर ताजे तावाने असते. या काळात ध्यान केल्याणे मनाची स्थिती सुधारते आणि सत्व गुण वाढतो आणि रजस आणि तमस गुणांमुळे होणारी मनाची अस्वस्थता व चलबिचल आणि आळस कमी होतो.
२. श्वासाची शक्ती | Power of Breath
कोणत्या नाकपुडीतून श्वासोच्छवास जास्त जोरात चालू आहे ते तपासा. आयुर्वेदानुसार उजवी नाकपुडी ही सूर्य नाडी (पित्त) असते आणि डावी नाकपुडी ही चंद्र नाडी (कफ) असते. मेंदूचा उजवा भाग सृजनशील क्रियांवर नियंत्रण करतो तर डावा भाग तार्किक मौखिक क्रियांवर नियंत्रण करतो. संशोधनानुसार जेव्हा डाव्या नाकपुडीने श्वास घेतला जातो तेव्हा मेंदूचा उजवा भाग प्रभावी होतो. आणि तसेच उलटही होते.
३. सकारात्मक लहरी | Positive Vibrations
प्राचीन परंपरेनुसार सकाळी उठून तळहातावरील रेषा बघण्याचा प्रघात ठेवा. (लक्ष्मी, ज्ञान आणि शक्ती) त्यानंतर अंगठ्याने हाताच्या बोटांवर गोल गोल फिरवा. आधी घड्याळाच्या दिशेने आणि मग उलट्या दिशेने. दोन्ही हात एकमेकांवर चोळा. नंतर उजवे मनगट उजव्या बाजूने आणि डावे डाव्या बाजूने फिरवा. ज्या बाजूची नाडी चालू असेल त्या तळहातावर प्रथम ओठ टेकवून चुंबन घ्या आणि नंतर दुसऱ्या हातावर. (चुंबनाने ऊर्जा वाढते. तळहातावर चुंबन देण्याने तुम्ही स्वत:ला व्यक्त करण्याच्या उत्तम साधनाला उत्तम लहरी पोहोचवत आहात.) दोन्ही हात एकमेकावर चोळा आणि हलकेच हात चेहऱ्यावर फिरवा आणि नंतर डोके, कांदे, दंड, पाय, यावर फिरवा. असे करण्याने तुम्ही एक कवच तयार कर्ता जे नकारात्मक शक्तींपासून तुम्हाला दिवसभर दूर ठेवेल.
४. संरक्षक मंत्र |Protection Mantra
सकाळच्या नित्यक्रमातील तील अगदी साधा आणि परिणामकारक असा मंत्र म्हणा. मंत्र म्हणून झाल्यावर रिकाम्या मानाने काही क्षण स्वस्थ बसा.
कराग्रे वसते लक्ष्मी. (हाताच्या टोकावर लक्ष्मीचा, धनाच्या देवीचा वास आहे)
करमध्ये सरस्वती (तळहाताच्या मध्यभागी सरस्वतीचा वास आहे. ज्ञान आणि कला यांची देवता.)
करमूले तू गोविंदम (तळहाताच्या खालच्या भागात गोविंदाचा, कृष्णाचा वास आहे).
प्रभाते शुभ करदर्शनम् (सकाळी तळहाताचे दर्शन घेणे शुभ आहे.)
५. सकारात्मक पाऊल |Positive Step
अंथरुणातून बाहेर पडताना जी नाडी चालू असेल ते पाऊल प्रथम जमिनीवर ठेवावे.
६. स्वच्छ व्हा | Clean up
थंड पाण्याने हात, तोंड धुवा. पाणी हे वीज वाहक आहे आणि संवेदनशील टिश्यू ना त्रास होत नाही. हात, पाय, तोंड, चेहरा आणि डोळे गार पाण्याने धुवा. नाक, दात आणि जीभ घासा.
७. व्यायाम आणि ध्यान करा |Meditate and Exercise
दोन्ही नाड्या समान वाहू लागे पर्यंत नाडी शोधन प्राणायाम करा. हृदयचक्र किंवा आज्ञाचक्रावर लक्ष केंद्रित करून ध्यान करा. सकाळच्या ताज्या हवेत सावकाश चालून या. अवती भोवतीच्या मनाला भावणाऱ्या साध्या सुंदर गोष्टी बघा. शक्यतो ताजी पांढरी वासाची फुले, हलक्या रंगाची फुले वगैरे बघा. व्यायाम म्हणजे साधारणपणे काही योगासने, सूर्यनमस्कार आणि प्राणायाम. पण चालणे, पोहणे या सारखे कोणतेही व्यायाम करू शकता. सकाळी केलेल्या व्यायामाने शरिर आणि मन मोकळे होते. जठराग्नी प्रज्वलित होतो, मेद कमी होतो, आणि एकूण हलकेपणा आनंद जाणवतो आणि शरिर प्रानाने भरून जाते. तरीही खूप दमवणार एव्यायाम करण्यापेक्षा तुमच्या क्षमतेपेक्षा अर्धा किंवा त्याहूनही कमी व्यायाम करावा.
८. स्वत:चे लाड करा |Pamper Yourself
अंगाला तीळाच्या तेलाने मालिश करा. (अभ्यंग) डोके, कपाळ, कानशिले, हात आणि पाय यांना २- ३ मिनिटे मालिश करणे पुरेसे आहे.
९. योग्य प्रकारे स्नान |Bath Right
अति गरम नाही आणि अति गार नाही अशा कोमट पाण्याने स्नान करा.
१०. दुपारची वेळ |Noon - Time
दुपारी १२ ते १ च्या दरम्यान जेवण करावे. पचनशक्ती यावेळी सर्वात जास्त असते. आयुर्वेदानुसार दुपारचे जेवण हे दिवसातील सर्वात जड असावे. जेवणानंतर अन्न पचनासाठी शतपावली करणे चांगले. अगदी लहानशी डुलकी काढायला हरकत नाही पण त्याहून जास्त झोप काढणे आयुर्वेदात त्याज्य आहे.
११. तिन्हीसांजेची वेळ | Twilight - Zone
हा दिवस आणि रात्रीच्या मधला संधिकाल असतो. ही संध्याकाळच्या प्रार्थनेची आणि ध्यानाची वेळ असते.
१२. रात्रीचे जेवण |Dinner
रात्रीचे जेवण ६ ते ७ च्या दरम्यान घ्यावे. दुपारच्या जेवणापेक्षा हलके असावे. रात्रीच्या जेवणानंतर झोपेपर्यंत तीन तास तरी अंतर असावे म्हणजे अन्न पचनाला मदत होते. जड जेवणानंतर लगेच झोपणे टाळावे. दहा पंधरा मिनिटे चालण्याने अन्न पचनास मदत होईल.
१३. झोपण्याची वेळ |Bedtime
रात्री १०.३० ही झोपण्यासाठी चांगली वेळ आहे. शरिर मन शांत करण्यासाठी झोपण्यापूर्वी गायीच्या तुपाने पायाच्या तळव्यांना जरासे मालिश करावे.
टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.
DR. DIVYA PRAKASH PAWAR – RATHOD
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT (Diploma In Yoga Teacher) [योग शिक्षिका]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments