उंबर / औदुंबर
- divipawar94
- May 16, 2021
- 4 min read

क्षिरी वृक्षांपैकी एक वृक्ष म्हणजे उंबर. उंबराची पाने तोडली असता त्यातून पांढरा चिक वाहतो. म्हणूनच याची गणना क्षिरी वृक्षांमध्ये होते. याची छाया शीतल असून सौख्यकारक आहे. उंबराचे लाकूड अतिशय चिवट असते. उंबराच्या झाडाच्या उजव्या बाजूस व झाडाखाली बहुत करून पाण्याचा झरा सापडतो. उंबराच्या झाडाखाली असणारे पाणी स्वास्थकारक असते. उंबराचे वृक्ष महाराष्ट्रात सर्वत्र आढळतात. जंगलात, नदीच्या किनारी, डोंगरकपारीला रस्त्याच्या कडेला शेताच्या बांधावर वाढलेले आढळतात.मंदिर व देवळच्या परिसरात धार्मिकस्थळी उंबराची लागवडही केली जाते. उंबराचे वृक्ष १० ते १५ मीटर उंचीपर्यंत वाढतात. खोड मोठे, मजबूत असून, फांद्या अनेक पसरलेल्या पांढरट करड्या रंगाच्या, गुळगुळीत असतात. पाने साधी, एका आड एक, सदाहरित, लंबवर्तुळाकार-अंडाकृती असतात. पाने ७ ते १५ सें.मी. लांब व ३ ते ६ सें.मी. रुंद, टोकाकडे साधारण निमुळती दोन्ही पृष्ठभाग गुळगुळीत, वरचा भाग चकाकणारा असतो. फुले सूक्ष्म, गोल आकाराच्या फळासारख्या पुष्पमंजिरीत येतात. ही फुले झाडाच्या मुख्य खोडावर, तसेच फांद्यावर येतात. तयार झालेली फळे हिरव्या रंगाची पिकल्यावर लालसर रंगाचे बनतात. फुले एकलिंगी गोलाकार फुलाच्या आतील भागात सूक्ष्म नर मादी व वांझ फुले असतात. नरफुले टोकाकडील वरील बाजूस असतात, तर मादी फुले टोकाकडील बाजूस असतात. नर व मादी फुलांच्यामध्ये वांझ फुले असतात. फळाच्या वरच्या बाजूस देठाच्या खालच्या बाजूस लहानसे छिद्र असते. या छिद्रातून परागीभवन करणारे लहान कीटक आत शिरतात व परागीभवन करतात. त्यानंतर फळ वाढू लागते. फळे गोलाकार, वरील बाजूस नाजूक लव असणारी असतात. पिकल्यावर लाल होतात. बिया अनेक, लहान,पिवळ्या रंगाच्या असतात. उंबराची साल स्तंभन आहे. पक्व फळे शीतल, स्तंभक व रक्तसंग्राहक आहेत.
गण - मूत्रसंग्रहणीय, कषायस्कन्ध (च०); न्यग्रोधादी (सु०) क्षीरिवृक्ष, पंचवल्कल (भा)
कुल – वटकुल (Moraceae)
लॅटिन नाव – Ficus glomerata.
पर्याय – जन्तुफल, यज्ञांग, हेमदुग्धक, क्षीरवृक्ष, कालस्कंध, शीतवल्क, जतुवृक्ष,
उपयुक्तांग – त्वचा, फल, क्षीर, रस.
गुण – • रस- कषाय, मधुर, (कच्चे असता). त्वचा कषायरस. • पक्वफळ - मधुर- कषाय. विपाक - त्वचा व कच्चे फळ कटु, • पक्वफल - मधुर वीर्य - शीत. गुण - गुरु, रूक्ष.
कर्म – • कषायरसाने व रूक्ष असल्याने कफघ्न. कषाय, मधुर आणि शीत असल्याने पित्तघ्न. • पक्वफल मधुर असले तरी कषाय अनुरसामुळे कफकर न होता कफघ्न कार्य करते.
उपयोग – 1) त्वचाविकारात त्वचेचा रंग बिघडला तर उंबराच्या फांदीला येणारे कोंब वाटून तो लेप त्वचेला लावावा.
2) लहान मुलांना पातळ शौचास होत असेल तर उंबराच्या रसात साखर घालून ते सेवन करावे.
3) पिकलेले फळ दाहनाशक,मांस वृद्धीकारक,मनःप्रसादक असून पौष्टिक आहे. चंदन व उंबर ही दोन द्रव्ये दाह कमी करणाऱ्या द्रव्यांमध्ये श्रेष्ठ द्रव्ये.
4) डोळे लाल होणे, पाणी येणे, डोळ्यांची जळजळ आदी लक्षण उत्पन्न झाल्यास उबरख्या पानांचा काढा करून स्वच्छ कपड्याने गाळून घ्यावा व थंड झाल्यावर डोळ्यांत त्याचे २ –२ थेंब दिवसातून ४ वेळा टाकावे. नेत्रज्योती तेज होते.
5) लहान मुलांचे गालगुंड सुजले असता उंबराच्या चिकाचा जाडसर लेप लावावा. लहान मुलांच्या आवेवर किंवा रक्ताच्या हगवणीवर चिकाचे ५-७ थेंब बत्ताश्या सोबत द्यावे.
6) जिभेला फोड येणे, चट्टे पडणे, हिरडयातून रक्त वाहणे, दातदुखी, दात हलणे या विकारांवर याची साल किंवा पानांचा काढा तयार करून तो तोंडात ठेवावा.
7) कडकीवर रोज सकाळी २ फळे खडीसाखरेसह घ्यावीत,लगेच वजन वाढते.
डांग्या खोकल्यावर याचा चीक टाळूवर हळुवार लावावा. याच्या सालीचा काढा लघवीची आग,तिडीक,ठणका किंवा लघवीच्या जागेतील व्रणावर उत्तम.
9) हातापायांची त्वचा फाटल्यास किंवा पायांच्या तळव्यांना कावे पडल्यास होणारया वेदना कमी करण्यासाठी उबराच्या पाढरया द्रव्याचा लेप लावल्याने जखम भरून सामान्य होण्यास मदत होते.
10) जुनाट जखम उंबराच्या सालीच्या काढयाने धुतली की लगेच बरी होते. उंबराच्या मुळातून पाणी वाहत असते ते दोषी प्रमेह व उपदंश या रोगात देतात.
11) उंबराचे सत्व किंवा घनवटी नाडीव्रण,भगंदर,जुनाट जखम,सूज,बद,गंडमाळा बरी करते.
12) तोंड आल्यानंतर याची गोळी चघळतात. मुका मार किंवा सांधेदुखीवर याची घडी ठेवावी. कृमींवर हे एक वस्ताद औषध आहे.
13) रक्तपित्तावर उंबराची पिकलेली फळे गुळासह खावीत.
14) उबराच्या सालीचा लेप तुपासह सुजेवर लावतात.
15) मूतखड्यावर उंबराच्या मुळाच्या सालीचा रस २०-३० मिलि साखरेसह दिला जातो.
16) सर्व अंगाचा दाह कमी करण्यासाठी उंबराची फळे द्यावीत.
17) गर्भिणीच्या अतिसारावर उंबर मधाशी द्यावे.
18) भस्मक म्हणजे अति खा-खा करण्याची इच्छा.. यात उंबराच्या सालीचा कल्क दुधासह दिला जातो.
19) विंचवाच्या विषावर उंबराचा पाला वाटून दंशावर लावतात. नाकातून वरचेवर रक्तस्त्राव होत असेल तर पिकलेली फळे तुपात तळून वेलदोडयाची पूड व साखर घालून प्रातःकाळी खावीत.
20) वरचेवर होणाऱ्या गर्भपातासाठी उंबराची पिकलेली फळं व साल खाल्ली तर गर्भाशयाच्या मांसपेशींना बळ मिळते आणि गर्भपात होण्याची शक्यता कमी होते.
21) शरीरातील रक्त व पित्त दूषित होऊन अंगाची जळजळ झाल्यास उंबराच्या सालीचा काढा पोटात घ्यावा. सतत तहान लागत असल्यासही हाच काढा घेतल्यास फायदा होतो. तसेच नाक, तोंड व गुदद्वारातून रक्त पडले तर हाच काढा फायद्याचा आहे.
22) मासिक पाळीच्या वेळी होणारा अधिक रक्तस्त्राव उंबराच्या सालीचा फांट दिला असता कमी होतो. तसेच उंबराच्या पिकलेल्या फळाचा रस त्यात गूळ वा मध घालून प्यावा
23) मलेरिया किंवा हिवताप विकारात उंबराच्या सालीचे चूर्ण दुधातून घ्यावे.
24) काहींना बाहेरील वारंवारच्या खाण्यापिण्यामुळे काविळचा संसर्ग पुन:पुन्हा होत असतो. अशांनी बकरीच्या दुधात फळे उकडून ती खाल्ल्यास पंधरवडय़ात खूप आराम मिळतो.
25) होरपळल्यावर जळलेल्या त्वचेकर याच्या सालीचा लेप लावल्यास वेदना हमखास कमी होतात.
26) ग्रीष्म ऋतूतील गरमी किंवा आग उत्पन्न करणारे विकार तसेच देवीच्या आजारासारख्या विकारात फोड आल्यावर पिकलेल्या फळाचा रस त्यात साखर टाकून तयार केलेल सरबत प्यावे.
27) मधुमेह झाल्यास उंबराच्या कोवळ्या पानांचा रस त्यात २० मिली. मध घालून प्रत्येक दिवशी २ – ३ वेळा प्यायल्याने वारंवार लघवीला जावे लागत नाही. तसेच लघवीतील साखरेचे प्रमाण सामान्य होण्यास मदत होते.
28) गर्भाशयाच्या सुजेसाठी औदुंबरावलेह हे रामबाण औषध आहे.
29) सरक्त द्रवमलप्रवृत्तीमध्ये उंबराच्या मुळाचा व पानांचा काढा देतात.
30) पाइल्स किंवा फिशरमध्ये गुदाच्या ठिकाणी झालेल्या जखमेवर उंबराच्या पंचांगापासून बनविलेले तूप वापरतात. याच तुपाचा एनिमा अल्सरेटीव कोलायटीसमध्ये दिला जातो.
31) योनीदाहामध्ये सालीचा काढयाने धावन दिले जाते.
32) उंबराच्या कोवळ्या पानांचा रस मधूमेहात दिला जातो.
टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.
Dr. Divya Prakash Pawar BAMS, MS (Gynaecology And Obstetrics) DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)] PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services) DDN (Diploma In Diet And Nutrition) MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments