केस वाढीसाठी उपाय !
- divipawar94
- Aug 7, 2021
- 3 min read
• आपली आई अगदी आपला जन्म झाल्यापासून आपल्या डोक्याची तेल लावून चांगली चंपी करते. तेल मालिश किंवा डोक्याची चंपी आपल्या केसांच्या आतील रक्तवाहिन्यांना रक्तप्रवाह सुरळीत करण्यास कारणीभूत ठरते. केसांची मुळे व केसांच्या आतील त्वचा म्हणजेच आपल्या स्कॅल्पला ऍक्टिव्हेट करून तेल मालिश केसांच्या वाढीसाठी उत्तेजना देते. थंड तेला ऐवजी हॉट ऑईल मसाज किंवा तेल गरम करून केसांच्या मुळापाशी मसाज केला तर त्यामुळे केसांच्या ग्रोथवर सकारात्मक परिणाम होतो. केसांची वाढ झपाट्याने होऊ लागते व केसांचे आरोग्य देखील सुधारते. यासोबतच नियमित केसांच्या मुळाशी मालिश केली तर आपल्या टाळूचे आरोग्य चांगले राहते तसेच डोके शांत राहून आपल्या मेंदुला देखील त्याचा फायदा होतो. केस कोरडे रुक्ष होणे, केस तुटणे, केस अशक्त होणे यासारख्या समस्या तसेच केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे या समस्यांना देखील चाप बसतो.
• पूर्वी आपल्या घरांमध्ये मेहंदी किंवा आवळा पावडरचा हेअर पॅक करून केसांना लावण्याची पद्धत होती ज्यामुळे केसांचा रंग गर्द व केस चमकदार व मुलायम होण्यासाठी मदत होत असे. मात्र आजकाल बाजारामध्ये वेगवेगळ्या हर्ब्स व वनौषधीनी युक्त असेल आयुर्वेदिक आणि हर्बल हेयर पॅकचे पॅकेट्स मिळतात. हेअर ग्रोथ बुस्टींग तत्वांनी युक्त हे हर्बल हेअरपॅक आपल्या केसांची ग्रोथ वाढवण्याकरता आपल्याला उपयोगी ठरतात. ज्यामध्ये आवळा, हिना, नागरमोथा, भृंगराज, ब्राह्मी, जास्वंद,कढीपत्ता, मेथीदाणे, लिंबू, मेहंदी यांसारख्या आयुर्वेदिक वनौषधींचा वापर करून हे हेअर पॅक बनवलेले असतात. फक्त पाण्यासोबत त्याची चांगली पेस्ट करून सहजपणे केसांवर लावावे! १-२ तास केसांवर लावुन केस साध्या पाण्याने धुवावे. या हेअर पॅक्समुळे केसांची रंगत वाढते तसेच केस मजबूत होऊन केसांच्या सर्व समस्या हळुहळू दूर होतात व केसांची ग्रोथ होण्यासाठी उपयोग होतो.
1. बरेचदा केसवाढीकरता आवश्यक असलेले कॅरेटिन हे प्रोटीन आपल्या आहारामधुन मिळत नसते त्यामुळे डॉक्टर आपल्याला केसांचे आरोग्य चांगले राहण्याकरता होमिओपॅथिक तसेच आयुर्वेदामध्ये अनेक प्रकारचे हेअर रेज्युवेनिटिंग सप्लीमेंट दिले जातात त्यामुळे केसांची वाढ चांगल्या प्रकारे होते तसेच केसांच्या अनेकाविध समस्या जसे केस गळती, केस पांढरे होणे, केसांमध्ये कोंडा होणे हे देखील कमी होते. आपल्या आहारातील कमतरता भरून काढण्याकरता हे सप्लिमेंटरी औषधे किंवा गोळ्या आपल्याला उपयुक्त ठरतात. वेगवेगळे हेअर टॉनिक, कॅप्सुल्स बायोटिन, मेलेनिन, कॅल्शिअम, सल्फरचा आवश्यक पुरवठा या आयुर्वेदिक तसेच हर्बल व होमिओपथीच्या तोंडावाटे घेण्याच्या गोळ्या देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले कॅरेटिन बायोटीन आपल्या शरीराला या द्वारे पुरवले जाते. आवळ्याचा वापर करून आमला तेल बनवले जाते.आवळ्यापासून बनवलेला हेअर पॅक आपल्या केसांचे आरोग्य सुधारतो व विटामिन सी आणि जीवनसत्व व खनिजेयुक्त असलेल्या आवळा केसांची लांबी वाढण्यात मदत करतो.
• बऱ्याच संशोधनानुसार असे सिद्ध झाले आहे की कांद्याचा रस देखील केसांची वाढ होण्यासाठी उपयुक्त आहे. तांबडे किंवा गुलाबी रंगाचे कांदे या प्रयोगा करता वापरावे. पांढर्या कांद्याचा वापर करू नये. याकरीता कांदे चिरून खोबरेल तेलामध्ये मंद आचेवर शिजवून घ्यावे. तेलाचा रंग लालसर पिवळा झाला की कांद्याचे सत्त्व तेलात उतरते. गाळणीने हे तेल गाळुन काचेच्या बाटलीत भरुन ठेवावे. आठवड्यातुन किमान दोन वेळा हे तेल केसांना लावावे. २तास तरी केसांना लावुन ठेवावे व नंतर केस धुणे. शक्य असेल तर रात्री झोपण्यापूर्वी हे तेल वापरावे व सकाळी माईल्ड शैम्पुने केस धुवावे जेणे करून कांद्याचे औषधी गुणधर्म केसांना मिळतील व केस वाढीसाठी उपयोग होईल. कांद्याचा रसामुळे केसांच्या रोमछिद्रांना पोषण मिळते. केसांची मुळे मजबूत होतात व केसांची वाढ होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होते.
• डोके खाली करून केस मानेकडुन कपाळाकडे उलट्या दिशेने खाली वाकुन विंचरावे तसेच केसांना मालिश करताना व तेल लावताना देखील डाउनवर्ड डायरेक्शन ने मालिश करावे. रोज दिवसातून पाच मिनिटे का होईना मान खाली करून केस डाउनवर्ड डायरेक्शन ठेवुन मालिश करावी. असे केल्याने मेंदुला रक्तपुरवठा चांगला होतो त्यामुळे केसांचा त्वचेखालीसुद्धा रक्ताभिसरण चांगले होते व केसांची वाढ होण्यास मदत होते. हाताच्य बोटांद्वारे सर्कुलर मसाज केला तर आपल्या बोटाच्या अग्रभागाने अक्युप्रेशर पॉईंट दाबले जातात. ज्यामुळे हेअर फॉलिकल्स मजबुत होतात. आपल्या हाताच्य बोटांनी संपूर्ण डोक्याला व टाळूवर मसाज केल्यामुळे केसांची मुळे हेअर फॉलिकल्स यांच्यातील रक्तप्रवाह वाढण्यास मदत होते त्यामुळे केसांचे आरोग्य देखील चांगले राहते व केस वाढण्यास मदत होते.
• शिकेकाई व रिठा हे पारंपारिक शैम्पु मानले जातात. केसांच्या स्वच्छतेसाठी शिकेकाई व रिठा अतिशय उपयुक्त आहेत. या वनौषधींचा वापर करुन आपण केमिकल फ्री जीवन शैली वापरली तर आपल्या केसांची वाढ कोणीही थांबवू शकत नाही. त्याकरता पारंपरिक व पुरातन काळापासुन वापरले जाणारे केस धुण्याचे हर्ब्स शिकाकाई व रीठा यांचा वापर करावा. वेस्टर्न व ईस्टंट शाईन चा दावा करणारे केमिकल्सयुक्त हेअर प्रोडक्ट्स केसांना कमकुवत बनवतात. या प्रोडक्ट्समध्ये केमिकल्सचा सुमार वापर केला जातो. यातील सल्फेट व पॅराबिन केसांची हानी लावतात.
अनेक महिलांचे केस अगोदर खूप चांगले असतात, मात्र ब्युटी पार्लर व स्पामध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या केमिकल ट्रीटमेंट केल्यामुळे केस गळू लागतात. तसेच केसांचे आरोग्य खालावते व ज्यामुळे केस गळती होऊन केसांची लांबी खालीवर होते. बरेचदा स्ट्रेटनिंग करताना केसांना हिट देऊन केस जळुन तुटतात. यासारख्या प्रकारांमुळे केस जास्त गळतात व तुटतात. खालीवर झालेल्या केसांना कापण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. याकरता सारखे ब्युटिपार्लर व स्पा च्या वार्या बंद करणे महत्त्वाचे आहे.
टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments