top of page
Search

करावे नित्यदिन सर्वांगास अभ्यंग

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • May 14, 2021
  • 3 min read

चरकसंहितेत चरकांनी सांगितल्याप्रमाणे:


मूर्धोऽभ्यंगात् कर्णयोः शीतमायुः कर्णाभ्यंगात्‌ पादयोरेवमेव।

पादाभ्यंगान्नेत्ररोगान् हरेश्च, नेत्राभ्यंगाद् दन्तरोगाश्च नश्येत्॥ (चरकसूत्र ५|८४)

अर्थात : डोक्यास तेल लावून मर्दनाने कानविकार दूर होतात. कानाभोवती, कानाच्या पाळीस मर्दन तसेच कानात तेल टाकण्याने पायांना त्याचा फायदा मिळतो. डोळ्यात गायीचे तूप टाकल्याने आणि डोळ्यास तेलाने (हळुवार) मर्दन केल्याने दातांचे रोग नष्ट होतात. (बदामाचे तेल, तिळाचे तेल इत्यादी.) (मोहरी, करडई इत्यादींपासून बनवलेली तीव्र तेले वापरू नयेत.)

शरीरात ज्या ठिकाणी वात हा दोष कार्यरत असतो त्या ठिकाणी तैलादी द्रव्ये ही वात नाशनाचे काम करतात. वाताचे रुक्ष व खरता हे दोन गुण मार्दवता व स्निग्धता या उलट असल्याने वातविकाराचे शमन होते. आपल्या शरीरातील अवयवांचे त्वचा रक्षण करीत असते. त्वचा हे शरीराचे बाह्य आवरण आहे. तसेच शरीराचा मुख्य प्रदर्शनीय भाग आहे. त्वचेच्या ठिकाणी स्पर्शानुभव होत असल्याने वाताची रुक्षता नियमित अभ्यंग करणारया लोकांमध्ये नष्ट होऊन वात रोगाची उत्पत्ती टाळली जाते. त्यामुळे त्वचेचे सौंदर्य निगा राखल्यास व्यक्तीमत्त्वाची उत्तम छाप पडते. त्वचेचे पुष्कळ विकार हे हृदयरोग, बेशुद्धी यासारखे गंभीर नसतात. त्यामुळे बऱ्याचदा त्वचा विकारांकडे दुर्लक्ष्य केले जाते. परंतु एकूणच आरोग्याच्या दृष्टीने त्वचाविकारांवर योग्य उपचार घेणे, त्वचेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. निरोगी त्वचेचे रक्षण व्हावे, त्वचेचे निगा योग्य प्रकारे राखली जावी यासाठी आयुर्वेदात अभ्यंग स्नानाचे महत्त्व सांगितलेले आहे.

हिवाळ्यात वातावरणातील रूक्षतेमुळे त्वचा रूक्ष व फुटीर होते. त्यामुळे ह्या ऋतूत त्वचा विकार होण्याचा जास्त संभव असतो. त्याचप्रमाणे पूर्वीपासून असणारे, सुप्तावस्थेत असणारे त्वचाविकार बळावण्याचा संभव हिवाळ्यात जास्त असतो. त्यामुळे अभ्यंग स्नान, पथ्यापथ्य पाळणे, आयुर्वेदिक औषधे घेणे यासारख्या उपायांनी त्वचेची काळजी घेणे हितावह ठरते. आपण फक्त दिवाळी सारख्या मंगल प्रसंगीच अभ्यंग स्नान करीत असतो. परंतु केवळ दिवाळीतच नाही तर हिवाळ्यात आणि इतरही ऋतूत रोजच अभ्यंग करावे असे आयुर्वेदाने सांगितलेले आहे. भारतीय संस्कृतीत स्नानाचे महत्व वर्णन केलेले आहे. कार्तिक स्नान, माघ स्नान असे पंचांगात वर्णन आढळते. कार्तिक महिन्यात, माघ महिन्यात भल्या पहाटे उठून केलेल स्नान म्हणजेच कार्तिक स्नान, माघ स्नान. त्यानंतर भगवन्ताची आराधना, काकडारती करतात. धार्मिक कारणाने का होईना प्रत्येकाने पहाटे उठून अभ्यंग स्नान करावे हा त्यामागे उद्देश आहे.


करावे नित्यदिन सर्वांगास अभ्यंग

प्रफुल्लीत मन उत्साही सर्वांग

तारूण्य टिकेल आयुष्य भर

न दुखणार गुडघा अन् कंबर

तेजोमय दिवाळी, सुवर्ण मयी काया

हिच खरी अभ्यंगाची किमया.......


पहाटे उठून केलेल्या स्नानाचे महत्त्व जास्त आहे. नियमित पहाटे उठून अभ्यंग करायला सांगितले आहे. अभ्यंग करणे सुगंधी औषधी तेल हलक्या हाताने शरीराला लावणे. सर्वांनी घरच्या घरी रोज अभ्यंग करण्याचे अनेक फायदे आहेत. अभ्यंगामुळे वार्धक्य लांबते , तारूण्य टिकते, त्वचेच्या सूरकुत्या कमी होतात. Anti- Aging परिणाम मिळतात. श्रम केल्यामुळे थकवा आला असेल तर तो कमी होतो. वाढलेल्या वात दोषाचे शमन होते. रोजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात आपल्याला श्रम होतात. तो थकवा कमी होण्यासाठी अभ्यंग करावे. नियमीत अभ्यंग केल्याने दृष्टी सुधारते, शरीर पुष्ट होते, झोप चांगली लागते, आयुष्य वाढते , त्वचा सुकुमार, मऊ होते., शरीराचे स्नायू पिळदार होतात. त्याही पुढे जाऊन नियमित व तात्रिक दृष्ट्या योग्य प्रकारे तैलाभ्यंगाने सर्व अंगप्रत्यंग पुष्ट व बलवान होतात. दृष्टि तेजोमय होते व मन समाधानी होऊन निद्रा सुखकर होते. अभ्यंग म्हणजे वास्तवता शरीरातील वेगवेगळ्या सायुना दिला गेलेला विशिष्ट प्रकारचा व्यायाम होय. या क्रियेमुळे स्नायुंना गती, चालना मिळुन ते अबाधित रित्या काम करु लागतात. अभ्यंगामुळे रक्तवाहिन्या व रक्तात घर्शन क्रियेने उष्णतेची निर्मीती होते. परीणामी रक्ताधीन असलेले विजातीय द्रव्ये तसेच त्वचेखालील अतिरिक्त फॅट वेगवेगळे होऊन विविध मार्गाने शरीराबाहेर फेकले जातात. परीणामी शरीरातील सर्वात महत्वाचा घटक रक्त शुध्द होऊन शरीराची कांती निखळून येते. शरीरात असणारया वेदना, सुज या तैलाभ्यंगाने नष्ट होऊन अस्थी सांध्यांना पुष्टता व दृढता प्राप्त होते. तसेच मणुष्य देखील शक्ती संपन्न होऊन दिर्घायुष्य प्राप्त करतो. नियमितपणे अभ्यंग केल्यास म्हातारपण उशिरा येते. नायूंमधील कडकपणा कमी होतो आणि अंग हलके होते. त्वचेवर सुरकुत्या पडणे, केस गळणे यांसारखे विकार होत नाहीत. अशाप्रकारे शरीराचा लवचिकपणा तसेच कांती थोडक्यात संपुर्ण आरोग्यच जर अभ्यंगा सारख्या सहज सोप्या उपायाने मिळत असेल तर प्रत्येकाने त्याचा अवश्य लाभ घ्यावयासच हवा. शिर: श्रवण पादेषु तं विशेषेण शिलायेत | असे म्ह्टले आहे. डोके, कान, पाय, या ठिकाणी विशेष करून रोज अभ्यंग करावे. केसांच्या वा चेहरयाच्या आरोग्यासाठी केस डोके, चेहरा यांना नियमित अभ्यंग करावे. पायांच्या आरोग्यासाठी पायांनाही अभ्यंग करावे. वमन, विरेचन इ. पन्चकर्म झालेल्या व्यक्ती, अजीर्ण झालेल्या व्यक्ती, कफ दोषाचे विकार झालेले यांना अभ्यंग करू नये.

अभ्यंगासाठी विविध औषधानी सिद्ध केलेली तेले वापरली जातात. वेगवेगळ्या प्रकारच्या त्वचेसाठी वेगवेगळी तेले वापरतात. वात प्रकृतीची त्वचा रूक्ष, फुटीर असते. पित्त प्रकृतीची पिन्गट, सुकुमार असते. कफ प्रकृतीची त्वचा पांडुरकी, स्नेहयुक्त असते. अशा वेगवेगळ्या त्वचेच्या आरोग्यासाठी वेगवेगळी तेले वापरली जातात. कफ प्रकृतीच्या व्यक्तींची त्वचा तेलकट असते. त्यांनी अभ्यंगानन्तर स्नानाच्या वेळी उद्वर्तन म्हणजे उटणे लावावे. त्यामुळे त्वचेवरील जास्तीचे तेल निघून जाण्यास मदत होते. त्वचेखालील चरबी कमी होण्यास मदत होते. पित्तप्रकृतीच्या व्यक्तींना दुर्गन्धीयुक्त घाम येतो. त्यांनी स्नानाच्या वेळी घाम कमी करणार्‍या वनस्पतींपासून केलेले उटणे लावावे.

स्नान करताना डोक्यावरून करावे. असे असले तरी काही व्याधीत चेहर्यापासून खाली स्नान करावे. डोक्यावरून कोमट पाणी घ्यावे. गरम पाणी घेऊ नये. कारण डोळ्यांना त्रास होऊ शकतो. हिवाळ्यात सुखोष्ण पाण्याने स्नान करावे. उन्हाळ्यात कोमट किंवा गार पाण्याने स्नान करावे. स्नानानन्तर सर्व अंग, केस कोरडे करावे. अशा प्रकारे अभ्यंगयुक्त स्नान केल्यास आपल्या त्वचेच्या सौंदर्यात निश्चितच भर पडेल.


टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT (Diploma In Yoga Teacher)

[योग शिक्षिका]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page