गुलकंद
- divipawar94
- May 11, 2021
- 2 min read

गुलाबाचे फूल जितके नाजुक ,मोहक आहे तितकेच गुलाबाच्या पाकळ्यापासून बनवलेल्या या गुलकंदामुळे केवळ तोंडात गोडपणाच उतरत नाही, तर आपल्या आरोग्यासही बर्याच प्रकारचे फायदे होतात. साखर व गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार केलेला ‘गुलकंद’,चवीला अवीट आणि आरोग्याला हितकारी आहे. जसजसा उकाडा वाढायला लागतो , तसतसे पित्त, जळजळ , उष्माघात यासारखे आजार आपले डोके वर काढायला सुरूवात करतात. मग गरमी पासून सुटका करण्यासाठी बाजारात मिळणारी शीतपेयं घेण्यापेक्षा शीतदायी व तृष्णाशामक गुलकंदच घ्या.
गुलकंदाचे सेवन कसे करावे :
गुलकंदाचे फायदे पाहिले तर दिवसातून 2 वेळा एक चमचा गुलकंद सेवन करायचे मग ते लस्सी, फळांचा रस, मिल्कशेक, आईस्क्रीम, गुलाब चहा या कोणत्याही प्रकारे करू शकतो.
गुलकंद बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
a) 200 ग्रॅम गुलाबच्या पाकळ्या
b) 100 ग्रॅम पिठी साखर
c) 1 टीस्पून बारीक वेलचीची पावडर
d) 1 टीस्पून बडीशेप पावडर
कृती :
प्रथम गुलाबाच्या पाकळ्या धुवून स्वच्छ करा आणि नंतर एका काचेच्या भांड्यात झाकून ठेवा. आता या भांड्यात पिठी साखर घाला. यानंतर, त्यात वेलची पावडर आणि बडीशेप पावडर घाला आणि 10 दिवस उन्हात ठेवा. अधूनमधून हा पाक ढवळत रहा. जेव्हा तुम्हाला असे वाटेल की, आता या पाकळ्या पूर्णपणे विरघळल्या आहेत, तेव्हा समजून जा की, तुमचा घरगुती गुलकंद आता पूर्णपणे तयार आहे. आता आपण याचा सहज वापर करू शकता.
गुलकंद सेवनाचे फायदे –
1) गुलकंदाच्या सेवनाने शरीरा ताजेतवाने राहते. तसेच गारवा मिळतो. उन्हामुळे येणारा थकवा, आळस, शरीरातील जळजळ दूर होते. शरीराला एनर्जी देणारे हे टॉनिक आहे.
2) उन्हाळ्यात अनेकांच्या नाकातून रक्त येते. यातून वाचण्यासाठी उन्हात जाण्याआधी दोन चमचे गुलकंद खा. डोळे लाल होणे कमी होते.
3) तोंड आल्यास गुलकंदाचे सेवन करावे. तसेच हिरड्या सुजल्यास यावरही गुलकंदाचे सेवन फायदेशीर ठरते.
4) ज्यांना सतत विसरण्याची सवय असते त्यांनी दररोज दुधासोबत एक चमचा गुलकंद खावे. यामुळे मेंदूचे कार्य जलद होते.
5) गुलकंदाचे सेवन केल्याने पित्त प्रकोप होत नाही. पोटातील उष्णता कमी करण्याचे काम गुलकंद करतो. त्याशिवाय आतड्याचा अल्सर तसेच सूज यावर उपचार करून त्वरित आराम मिळतो.
6) गुलाबात लॅक्सेटिव आणि ड्यूरेटिक हे दोन्ही गुणधर्म आढळतात, जे आपली चयापचय क्रिया तीव्र करतात. जर, आपली चयापचय क्रिया वेगवान असेल, तर ते वजन कमी करण्यास आपल्याला मदत करते.
7) गुलकंदामुळे यकृताची ताकद वाढते. तसेच भूक आणि पचन सुधारण्यासही मदत होते.
8) त्वचेशी निगडित समस्यांमध्ये गुलकंदाचे सेवन केल्याचा फायदा होतो. त्वचेशी निगडित समस्या जसे डाग दूर होण्यास मदत होते. दररोज गुलकंद खाल्ल्याने त्वचा उजळते. यामुळे रक्त शुद्ध होते. त्यामुळे ब्लॅकहेड्स, पिपल्सच्या समस्या दूर होतात.
9) रोज रात्री झोपण्याच्या अर्धा तास आधी दूधासोबत गुलकंद घेण्याने झोप न येण्याची समस्या दूर होते. दुध आणि गुलकंद मुळे मेंदूतील मेलाटोनिन हार्मोन अधिक प्रमाणात तयार होते व त्यामुळे मन शांत होऊन चांगली झोप लागते.
10) ज्या स्त्रियांना पाळीच्या काळात अतिरक्तस्त्राव होतो तसेच ल्युकोरिया सारख्या समस्या उद्भवतात त्यावर गुलकंद उपयु्क्त आहे.
11) गरोदर महिलांसाठी याचे सेवन खूपच फायदेशीर ठरते. गरोदरपणात बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर गुलकंद खाण्याने फायदा होतो.
चविष्ट गुलकंदाचे फायदे लक्षात घेऊन त्याचे नियमित सेवन आरोग्यदायी ठरू शकते
टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT (Diploma In Yoga Teacher) [योग शिक्षिका]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments