चिया सीड्स किंवा सब्जाचे बी खाण्याचे फायदे
- divipawar94
- Aug 11, 2021
- 4 min read

चिया सीड्स किंवा सब्जाचे बी खाण्याचे फायदे उन्हाळा सुरू झाला की आपल्याला जागोजागी मडक्यांना लाल कपडा बांधलेले लिंबू सरबताचे ठेले किंवा गाडे रस्त्याने लागलेली दिसतात. उष्णतेचा चटका कमी होऊन अगदी अंतर्आत्मा शांत होऊन मनाला व शरीराला थंडाई व शांती लाभते. आपल्यापैकी बर्याच जणांनी लिंबू सरबताच्या गाडीवर पाण्याच्या बाटलीमध्ये काहीतरी छोट्या छोट्या काळ्या-राखाडी रंगाच्या फुगलेल्या बिया बरेचदा दिसल्या असतील. फालुदा आईसक्रीम खायचे म्हटल्यावर त्यामध्ये सब्जाच्या बिया म्हणजेच चिया सीड्सचा समावेश केला जातो. फालूदा आईस्क्रिम मध्ये गुलाबी रंगाच्या फालुदा फ्लेवरमध्ये आईस्क्रीमच्या ग्लासात थंडगार शेवयांसोबत तरंगणाऱ्या छोट्या छोट्या पारदर्शक बिया चुरुचुरु दाताखाली वाजवत खायला आणि पहायला देखील भन्नाट वाटतात ना? अनेक लोक लिंबू सरबतामध्ये देखील चिया सीड्स म्हणजे सब्जाच्या बिया टाकण्याचा आग्रह करतात असे देखील आपण पाहिले असेल!
सब्जा म्हणजे काय?
सब्जा म्हणजे चिया सीड्स हे भारतीय तुळशीचा एक प्रकाराचा असलेल्या वनस्पतीपासून मिळणारे बी आहे. सब्जाचे अनेक आयुर्वेदिक औषधी फायदे आहेत. प्राचीन काळापासून अंगातील उष्णता कमी करण्यासाठी सब्जाच्या बियांचा वापर केला जातो. सब्जाच्या बियांना फालुदा बीज, तुक्मरिया बीज, गोड तुळशीचे बी असे देखील म्हटले जाते! सब्जा हे मुळात भारतीय तुळशीच्या संवर्गातील वनस्पतीचा एक प्रकार आहे.
सब्जा चे फायदे
सब्जामध्ये अनेक पौष्टिक तत्वे आहेत. सब्जामध्ये उच्च प्रतीचे फायबर, ओमेगा थ्री फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात आहे. सब्जाच्या बियांमध्ये फायटोकेमिकल्स आहेत तसेच पॉलीफेनोलिक फ्लैवोनोईड्स जसे ओरिएंटिन, विसिनीन अशा प्रकारचे अँटीऑक्सीडेंट देखील आहेत. सब्जामध्ये नैसर्गिक तेल देखील आढळते. यामध्ये सायट्रल, लिमोनेन, युजीनॉल,सायट्रोनेलोल, टेरपीनॉल असे नैसर्गिक तेल देखील आढळते. सब्जा हे विटामिन ए आणि विटामिन के चा उच्च स्त्रोत आहे. सब्जामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ल्युटिन, जीएक्सॅथिन, बीटा कॅरोटीन, कॅल्शियम, फोलेट, मॅंगनीज, पोटॅशिअम, तांबे, मॅग्नेशियम ही खनिजे देखील मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. त्यामुळे सब्जाचे सेवन शरीराला अतिशय उपयुक्त आहे.
सब्जा हे शीत तत्वाचे बनलेले असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अंगातील उष्णता कमी करण्यासाठी व उष्णतेचा प्रभाव कमी होऊन सनस्ट्रोक, उष्माघातापासून संरक्षण मिळण्यासाठी दिवसातून कमीत कमी दोन तीन वेळेस लिंबाचा रस पीत असाल तर त्यामध्ये सब्जाचे बी टाकून लिंबाचा रस प्यावा किंवा फालुदामध्ये किंवा इतर पेयांमध्ये भिजवलेल्या सब्जाच्या बियांचा वापर केल्यामुळे शरीरामधील अतिरिक्त उष्णता निघून जाते व उन्हाळ्याच्या त्रासापासून आराम मिळतो. शीतगुणधर्म असलेल्या सब्जा बीया रात्रभर पाण्यात भिजवुन सकाळी नियमित सेवन केल्यास अंगातील उष्णता कमी होते. तसेच उष्णता विकारांमध्ये सब्जाचा उपयोग लाभदायक मानला जातो. उच्च पौष्टीक शक्ती असलेले सब्जाचे बी हे पचण्यासाठी सुलभ असते व त्याचे शरीरासाठी अनेक फायदे व लाभ असतात. त्यामुळे शारीरिक व मानसिक विकासासाठी सब्जाच्या बियांचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
सब्जामध्ये मोठ्या प्रमाणात अल्फा लिनोलेनिक अॅसिड असते. तसेच उच्च प्रतीचे फायबर असल्यामुळे भूक नियंत्रणात राहते. त्यामुळे वजन आटोक्यात राहण्यासाठी सब्जाच्या बियांचा वापर केला जातो. अनेक आहारतज्ञ सब्जाच्या बियांचा नियमित आपल्या आहारामध्ये वापर करण्याचा सल्ला वजन आटोक्यात आणण्याकरता आपल्या पेशंटला देतात. डायबेटिक पेशंटचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे रक्तातील शर्करा नियंत्रणात राहणे होय. मात्र बरेचदा सर्व पथ्य-पाणी पाळून देखील डायबेटिसच्या पेशंटला शरीरामध्ये रक्त शर्कराचे प्रमाण वाढून जाते. त्यामुळे त्यांना त्याचा त्रास होतो. अशा रूग्णांनी एक चमचा सब्जाचे बी ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवावे व सकाळी नाश्ता करताना दुधामध्ये मिसळून हे सब्जाचे बी सेवन करावे. यामुळे आपली रक्तशर्करा स्तर नियंत्रणात राहतो व डायबिटीस संबंधी त्रासामध्ये आराम मिळतो.
सब्जा म्हणजे चिया सीड्समध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असल्यामुळे पोटातील अन्नाला पचण्यासाठी सुलभता येते. तसेच सब्जाचे बी हे एक प्रकारे डिटॉक्सफिकेशन म्हणजेच शहरांमधील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करते. त्यामुळे ज्या लोकांना वारंवार बद्धकोष्ठता व मुळव्याधीचा त्रास होतो अशा लोकांनी आपल्या आहारामध्ये सब्जाच्या भिजवलेल्या बियांचा समावेश करणे हितकारक राहते. बद्धकोष्टता व गुदद्वारासंबंधीचा आजारांमध्ये गरम पाण्यामध्ये रात्रभर एक चमचा सब्जा भिजवून ठेवावा सकाळी हा भिजलेला सब्जा दुधासोबत सेवन केल्यामुळे बद्धकोष्ठतेची व गुदद्वारासंबंधीचा आजाराच्या सर्व समस्यांमध्ये आराम मिळतो. सब्जाच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन ए, विटामिन के तसेच लोह आणि मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात. त्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते. सब्जाच्या बियांमध्ये बीटा-कॅरेटीन असते त्यामुळे सब्जाच्या बीयांचे नियमित सेवन केल्यामुळे केस काळे, मजबूत व घनदाट होण्यास मदत होते.
जास्त तिखट व मसालेदार पदार्थ खाल्लाने बरेचदा पोटात आग पडते व जळजळ होऊन तीव्र त्रास होतो किंवा उष्णतेमुळे पोटात त्रास होत असेल तर मिल्कशेक, सरबत किंवा शिकंजीमध्ये सब्जाच्या बीया टाकून प्यायल्यास उष्णतेपासून त्वरित आराम मिळतो. सब्जाच्या बियांचा ऍसिडिटीसाठी देखील उपयोग केला जातो. एक ग्लास दुधामध्ये एक चमचा सब्जाचे बी टाकून पंधरा ते वीस मिनिटानंतर त्या बिया चांगल्या फुगल्यानंतर त्याचे सेवन करावे. त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास लगेच थांबतो. चिया सीड्स म्हणजे सब्जाच्य बियांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असते. त्यामुळे ऊर्जेचे स्त्रोत मोठ्या प्रमाणात शरीराला मिळते. ज्यामुळे शहरांमधील रक्त प्रवाह सुरळीत होतो व रक्त पातळ होऊन सुरळित वहन होते ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. त्यामुळे ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी नियमित सब्जाच्या बियांचे सेवन केल्याने फायदा होतो.
उच्च पौष्टिक मूल्य सब्जाच्या बिया म्हणजेच चिया सीड्समध्ये भरपूर प्रमाणात असतात. सब्जामध्ये उच्च प्रतिचे फायटोकेमिकल्स, पॉलिफिनॉल अँटीआक्सिडेंट असतात. यामुळे पचनसंस्थेसंबंधीचे आजार बरे होण्यास मदत होते शिवाय पचन सुलभ होण्यासाठी मदत होते. चिया सीड्स म्हणजे सब्जाच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम ,पोटॅशियम ,कॉपर ,मॅग्नीज ही खनिजे आढळतात. त्यामुळे सांधेवात व हाडांसंबंधीच्या दुखन्यांमध्ये चिया सीड्स म्हणजे सब्जाच्या बियांचे नियमित सेवन केल्यामुळे फायदा मिळतो. सुज नियंत्रकाचे काम सांधेदुखीमध्ये सब्जा करते. जर डॉक्टरांच्या निगराणीखाली व योग्य प्रमाणामध्ये चिया सीड्स किंवा सब्जाच्या बियांचे सेवन केल्यास सांधेदुखी तसेच अॉस्टियोपिरोसीस या सारख्या आजारांना देखील रोखता येते.
सब्जाच्या बियांचे दुष्परिणाम
गरोदर स्त्रियांनी सब्जाचे सेवन करू नये. गरोदर स्त्रियांमध्ये बाळाचा विकास होत असतो त्यामुळे अशा वेळी बाळाच्या वाढीकरता व गरोदर मातेच्या आरोग्य करता लक्ष देणे गरजेचे असते. चिया सीड्सचे गरोदरपणात सेवन केल्यामुळे इस्ट्रोजन नावाच्या हार्मोनची पातळी कमी प्रमाणात होऊ लागते. इस्ट्रोजन हे मासिक पाळी येण्यासाठी आवश्यक असलेले हार्मोन आहे. हे हार्मोन्स कमी झाल्यामुळे रक्तस्राव होऊन गर्भपात होण्याची शक्यता असते. त्यामुळे गरोदर स्त्रियांनी कधीही चिया सीड्स म्हणजे सब्जाचे बी खाऊ नये. वयोवृद्ध किंवा वयस्कर स्त्रि-पुरुष व लहान मुलांना देखील सब्जाच्या बियांचे सेवन करण्यास देऊ नये. सब्जाचे बी हे omega-3 फॅटी अॅसिड्सने परिपूर्ण असल्यामुळे हे बी भिजल्यावर अतिशय चिकट बनते. त्यामुळे भिजलेले बी जेव्हा वयस्कर व्यक्ती किंवा लहान मुले खातात तेव्हा त्यांना ते गिळण्याचा त्रास होतो व कधीकधी सब्जाचे बी घसा व गळ्यांमध्ये चिकटुन बसते. त्यामुळे बरेचदा श्वास देखील अडकुन पडतो. याकरता वयस्कर वृद्ध स्त्रिया व पुरुष तसेच लहान मुलांना श्वसनमार्ग व अन्ननलिका चॉकअप होण्याची शक्यता असल्यामुळे सब्जाचे बी खाण्यास देऊ नये. जर आपण एखाद्या आजाराने ग्रासलेले असाल किंवा आपण काही औषधे खात असाल तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कधीही मनाने चिया सीड्स किंवा सब्जाच्या बीयांचे सेवन करू नये. आपण आपल्या डॉक्टरला विचारूनच सेवन करावे.
टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments