top of page
Search

जेष्ठमधाचे आयुर्वेदिक फायदे

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • Aug 7, 2021
  • 7 min read

जेष्ठमध ही एक आयुर्वेदिक जडीबुटी असून आपल्यापैकी बऱ्याच जणांना जेष्ठमधाचे फायदे देखील माहीत आहेत. जेष्ठमधाला आयुर्वेदिक भाषेमध्ये ‘मुलेठी’ असे म्हटले जाते. सर्दी- खोकला व ताप यामध्ये आराम मिळण्याकरता सामान्यतः जेष्ठमधाचा वापर केला जातो. आजीबाईच्या बटव्यामध्ये ज्येष्ठमधापासून अनेक प्रकारचे घरगुती नुस्खे बनवले जातात. तर घरगुती उपचारांबरोबरच वेगवेगळ्या आयुर्वेदिक औषधांमध्ये देखील जेष्ठमधाच्या काड्यांपासुन बनवल्या जाणार्‍या पावडरचा वापर केला जातो.


जेष्ठमध ओळख

जेष्ठमधास आयुर्वेदात यष्टिमधु किंवा जेष्ठमध असे देखील म्हटले जाते. हिंदीमध्ये ज्येष्ठमध आला मुलेठी असे म्हटले जाते जेष्ठमध ही अतिशय महत्त्वपूर्ण व गुणकारी आयुर्वेदिक जडीबुटी आहे सर्दी पडसे व खोकला या मध्ये आराम मिळण्याकरता सामान्यपणे या जडीबुटी चा वापर केला जातो मात्र या चमत्कारी जडीबुटी चे अनेक फायदे आहेत जे आपल्याला माहित देखील नसतात जेष्ठमधाचा वापर मुख्यत्वे आयुर्वेदिक औषधी बनवण्यासाठी केला जातो. जेष्ठमध हे एक झुडूप किंवा रोपटे आहे. या झुडपाचे किंवा रोपाचे संपूर्ण खोड सालीसहीत सुकवून त्याचा वापर करतात. जेष्ठमधाच्या खोडामध्ये भरपूर आयुर्वेदिक गुण असतात. चवीला गोड असलेले जेष्ठमध आयुर्वेदिक औषध म्हणून वापरले जाते. याशिवाय दात व हिरड्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तसेच घसा दुखीसाठी देखील जेष्ठमधाचा वापर केला जातो. याच कारणामुळे अनेक आयुर्वेदिक टूथपेस्टमध्ये आता जेष्ठ मधाचा वापर केला जातो.


जेष्ठमधाचे फायदे

• केस वाढवण्याकरता जेष्ठमधाचा वापर केला जातो. जेष्ठ मधामध्ये केसांना पोषण देणारी व केस वाढण्यासाठी प्रोत्साहन देणारी तत्वे असतात. जेष्ठमध पावडर पाण्यामध्ये उकळून ते पाणी थंड करून केस धुतल्याने केसांचे आरोग्य सुधारते व केसांचे पोषण होऊन केस वाढण्यास मदत होते. याशिवाय ज्येष्ठमध आणि तीळ म्हशीच्या दुधामध्ये दळून केसांना लेप लावल्यास केस गळती थांबते.


• जर आपल्याला कायम डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागत असेल तर जेष्ठमध आपल्या करता अतिशय चांगले औषध ठरते. जेष्ठमध चूर्ण म्हणजे जेष्ठमध पावडर एक भाग घेवून त्यामध्ये एक चतुर्थांश कलिहारी चूर्ण व थोडेसे मोहरीचे तेल मिसळून केवळ याचा वास घेतल्याने देखील डोकेदुखीमध्ये आराम मिळतो.


• ज्या लोकांना सतत अर्धशिशीचा त्रास होतो, अर्धे डोके कायम दुखत असते अशा मायग्रेनचा रुग्णांकरिता जेष्ठमधाचा वापर अतिशय लाभदायी ठरतो. जेष्ठमध चुर्ण म्हणजेच जेष्ठमध पावडर व मध एकत्र मिसळून नाकामध्ये नेझल ड्रॉप प्रमाणे टाकल्यास अर्धशिशीच्या त्रासामध्ये आराम मिळतो.


• वाढत्या वयासोबत केस पांढरे होणे हा निसर्गनियम आहे. मात्र आजकाल अगदी लहान-लहान मुलांचे व तरुणांचे कमी वयात अकाली केस पांढरे होत आहेत. या समस्येवर उपाय करण्याकरता लोक मेहंदी,डाय लावुन केस काळे करतात. केमिकलयुक्त डाय किंवा हेअस कलर्समध्ये हानीकारक अमोनिआ नावाचे केमिकल असते.


• केस काळे किंवा शेड येत असली तरी सततच्या केमिकलयुक्त हेअर कलर्स व डायच्या वापरामुळे केसांचे अतोनात नुकसान होते. जेष्ठमधाचा वापर करून आपण केस गळती व केस पांढरे होण्याच्या समस्या रोखु शकता. त्याकरता आपल्याला 50 ग्रॅम जेष्ठमध पावडर , 750 मिलिग्रॅम आवळ्याचा रस व 750 मिलीग्रॅम तिळाचे तेल एकत्र मिसळून त्याचे चांगले मिश्रण बनवायचे आहे. नियमित हे तेल एक ते दोन थेंब नाकामध्ये टाकल्यामुळे अकाली केस पांढरे होणे थांबते व केस गळण्याची समस्या देखील कमी होऊ लागते.


• डोळ्यांची आग होणे, डोळ्यांना सूज येणे, डोळे लाल होणे, रांजणवडी होणे, कन्जक्टीव्हीटी किंवा डोळे येणे अशा अनेक प्रकारच्या डोळ्यांच्या आजारांमध्ये जेष्ठमधाचा उपयोग केला जातो. जेष्ठमधाचा काढा करून त्याने डोळे धुतल्यामुळे डोळ्यांच्या आजारांमध्ये फायदा होतो. जेष्ठमधाचे चूर्ण आणि बडीशेप हे समप्रमाणात घेऊन दळुन घ्यावे. हे चूर्ण सकाळ-संध्याकाळ रोज खाल्ल्यास डोळ्यांचे आरोग्य सुधारते व डोळ्यांची जळजळ होणे, डोळे लाल होणे, तसेच दृष्टी कमी होणे अशा समस्यांमध्ये चांगला लाभ मिळतो.


• कन्जेक्टिव्हिटी म्हणजेच डोळे येणे या समस्यांमध्ये देखील जेष्ठमधाचा उपयोग होतो. आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णतेमुळे डोळ्यांची सूज येवुन डोळे लाल होणे तसे डोळ्यांमधून पू येणे या समस्या दूर होतात. जेष्ठमध पाण्यात दळुन त्यामध्ये कापसाचा बोळा बुडवुन डोळ्यांवर पट्टी बांधल्यास डोळे लाल होणे किंवा लाली येणे कमी होते. ज्येष्ठ मध व आंवळा पाण्यात एकत्र दळुन अंघोळीच्या पाण्यात मिसळुन अंघोळ केल्याने तसेच डोळे धुतल्याने पित्त कमी होते. तसेच डोळ्यांतील पांढर्‍या डागांवर जेष्ठमध उपयुक्त आहे.


• जेष्ठ मध व द्राक्ष एकत्र दुधात शिजवुन त्याचे काही थेंब कानात टाकण्याने पित्तामुळे होणारे कानासंबंधी दुखण्य‍ांमध्ये लाभ होतो. जेष्ठमधाचे औषधी गुण कानासंबंधी आजारांमध्ये खुप लाभदायक आहेत.


• 3-3 ग्रॅम जेष्ठमध व सुंठामध्ये 6 वेलची आणि 25 ग्रॅम खडीसाखर मिसळुन चांगल‍ा काढ़ा बनवावा. या काढ्याचे 1-2 थेंब नाकात टाकल्याने नाकाचे रोग ठीक होतात.

• उष्णता विकारांमुळे किंवा विटामीन बी च्या कमतरतेमुळे सतत तोंडात फोड येणे, तोंड येणे या समस्या होतात. जर यावर आपण चांगले प्रभावी अौषध शोधात असाल तर जेष्ठमध हे अतिशय उपयुक्त अौषध आहे. तोंडातील फोड जाण्याकरता जेष्ठमधाचे तुकडे मधात बुडवुन चोखुन चोखुन खावे. याने तोंड येणे व तोंडातील फोड लगेच बरे होतात.


• जेष्ठमधाची काडी तोंडामध्ये ठेवून जास्त वेळ पर्यंत चोखत बसल्यास खोकल्यामध्ये आराम मिळतो व खोकला येत नाही. जर आपल्याला जास्त कोरडा खोकला होत असेल व खोकल्याची उबळ आल्यावर खोकला थांबत नसेल तर एक चमचा जेष्ठमध पावडर दोन-तीन चमचा मधासोबत चाटण करून दिवसातून 3 -4 वेळा घ्यावे. यामुळे खोकल्यामध्ये लवकर आराम मिळतो. जेष्ठमधाचा काढा बनवून 20 ते 25 मिली प्रमाणात सकाळ-संध्याकाळ सेवन केल्यास आपल्याला खोकल्यामध्ये आराम मिळतो.


• बरेचदा वातावरणातील बदलांमुळे किंवा विषाणु संक्रमणामुळे घसा बसणे,आवाज घोगरा होणे असे बदल होतात. बरेचदा आवाज ही नीट निघत नाही इतके घशात इन्फेक्शन होते. याकरता ज्येष्ठ मधाची काडी केवळ तोंडात ठेवुन लॉलीपॉप सारखी चघळत राहिले तरी घसा बसण्याच्या समस्येमध्ये आराम पडतो. ज्येष्ठ मध चोखल्याने घसा व गळ्यातील बरेचसे इन्फेक्शन व विषाणु संक्रमण दूर होण्यास मदत होते.


• जर आपणास एकसारखी उचकी येत असेल तर आपण बरेच घरगुती उपाय आजमावत असतो.मात्र उचकी बंद होण्यासाठी केवळ जेष्ठमधाची काडी तोंडात ठेवल्याने व चोखल्याने काही मिनटात उचकी येणे बंद होते.


• बर्‍याचदा श्वास जड होणे, धाप लागणे तसेच श्वासासंबंधी आजार सुरु होतात. याकरता जेष्ठमधाचा काढा नियमित 10-15 मिली दिवसातुन 3 वेळेस घेतल्यास श्वासासंबंधीचे आजार बरे होतात.


• ह्रदयरोग्यांसाठी उपाय म्हणुन 3-5 ग्रॅम ज्येष्ठ मध चुर्ण आणि तेवढ्याच प्रमाणात कुटकी चूर्ण एकत्र करुन घ्यावे. हे मिश्रण रोज 15-20 ग्रॅम साखर पाण्यात विरघळवुन त्या पाण्यात एकत्र करावे व हे पाणी रोज नित्यनियमाने प्यावे. या पाण्याच्या नियमित सेवनामुळे ह्रदयासंबंधी सर्व आजारांपासुन बचाव होतो व आराम मिळतो. पित्त दोषामुळे होणार्‍या ह्रदय रोगांकरता गंभारी, जेष्ठमध,मध, साखर यांना एकत्र मिसळुन चुर्ण बनवावे. हे चुर्ण खाऊ घालुन उलट्या करवुन घ्याव्यात यामुळे पित्त बाहेर पडते.

• पोटाचा अल्सर ही अतिशय गंभीर समस्या आहे. अल्सरचा उपचार करने बरेचदा खुप खर्चिक असते. याशिवाय अल्सरवर उपचार करणे गरजेचे देखील असते. वैद्यकीय उपचारांसोबतच पोटाच्या अल्सरवर काही घरगुती उपाय करणे देखील आवश्यक असते. जेष्ठमधाचा उपयोग आपण अल्सरवर घरगुती उपाय म्हणुन करु शकता.

• याकरता एक चमचा जेष्ठमध चूर्ण एक कप दूधासोबत दिवसातून 3 वेळा सेवन करावे. यासोबतच पथ्य म्हणुन पोटातील अल्सर झाल्यास मिरची- मसाले आणि तिखट पदार्थ खाणे वर्ज्य करावे.

• अपचन, अॅसिडीटी, शिळे अन्न खाणे यामुळे बरेचदा पोटदुखी होते. याकरता उपाय म्हणुन 1 चमचा ज्येष्ठ मधाचे चूर्ण मधामध्ये मिसळुन दिवसातून 3 वेळेस खायला द्यावे. या उपायामुळे पोट आणि आतड्यांमधील दुखणे थांबते व पोटदुखीपासुन सुटका होते.


• पोटफुगीच्या समस्येमुळे अनेक लोक आज त्रस्त आहेत. खाल्लेले अन्न व्यवस्थित न पचल्याने तसेच शारीरिक कसरत व व्यायाम न केल्याने अनेक लोकांना पोटफुगी होते. पोटाचा आकार फुग्यासारखा वाढतच जातो. यावर उपाय म्हणुन 2-5 ग्रॅम जेष्ठमध चूर्ण पाणी आणि साखरेसोबत मिसळुन खाल्ल्यास पोटाची चरबी कमी कमी होते व वाढलेला पोटाचा घेर हळुहळु कमी होतो.

• उल्टीमधुन रक्त येत असेल तर ही समस्या गंभीर असते. कॅन्सर, टी.बी यासारखे गंभीर कारण नसेल व उल्टीतुन रक्त येत असेल तर आपण जेष्ठमध आणि रक्त चंदन चूर्ण दोन्हीचे 1-2 ग्रॅम घेवुन हे मिश्रण 50 मिली दूधात मिसळावे. थोड्या-थोड्या कालांतराने हे सेवन केल्यास उल्टीमधुन रक्त येणे पूर्णपणे बंद होते.

• युरीनरी इन्फेक्शन किंवा उष्णतेच्या विकारांमध्ये लघवीला आग होणे, जळजळ होणे अशा प्रकारचे त्रास होतात. याकरता एक चमचा जेष्ठमध चूर्ण एक कप दूधासोबत नियमित सेवन करावे. यामुळे लघवीला जळजळ होणे, आग होणे कमी होते.

• जेष्ठमध, दारु हळद आणि एर्वारुबीज यांचे चूर्ण समप्रमाणात घेवुन एकत्र मिसळावे. दिवसातून तीन-चार वेळा तांदळाच्या धुवनात म्हणजेच तण्डुलोदक मध्ये मिसळुन प्यायल्यामुळे आराम मिळतो.

• बर्‍याच स्त्रियांमध्ये रक्ताल्पता पाहायला मिळते तसेच काही आजारांमध्ये व तापात रक्त कमी होते. ज्याला आपण अॅनिमिया असे देखील म्हणतो. शरीरात रक्त कमी झाले तर हिमोग्लोबीन कमी होऊन गंभीर आरोग्य समस्या निर्माण होतात. याकरता रक्तवाढीसाठी उपचार करावे लागतात. जेष्ठमध हे रक्तवाढीकरता अतिशय लाभदायक आहे. याकरता एक चमचा जेष्ठमध चूर्ण एक चमचा मधासोबत रोज खावे किंवा 10-20 मिली जेष्ठमध काढा बनवुन त्यात मध मिसळुन प्यावे.

• बाळंतपणानंतर बर्‍याचशा महिलांना दुध कमी येते किंवा कमी दुध येण्यामुळे बाळाचे पोट भरत नाही. बाळाला जन्मानंतर 6 महिने केवळ आईचे दूधच पाजावे लागते. ज्यामुळे बाळाचे अनेक आजारांपासुन संरक्षण होते. मातेला दुध कमी आल्यास बाळाची वाढ चांगली होत नाही. दुध येण्यासाठी लॅक्टोज ग्रंथींना सक्रीय होणे आवश्यक असते. स्तनद‍ा मातांना जेष्ठमधाचे चूर्ण नियमित सेवन करण्यास दिले तर बाळंतपणानंतर स्त्रियांना दुध कमी येणे किंवा दुध न येणे असे त्रास होत नाहीत. जेष्ठमध स्तनांमध्ये दूध निर्माण करणार्‍या ग्रंथींना सक्रीय करतात.


• 2 चमचे जेष्ठमध चूर्ण आणि 3 चमचे शतावरी चूर्ण एक कप दूधामध्ये चांगले उकळुन घ्यावे. हे मिश्रण काढ्याप्रमाणे अर्धे होईस्तोवर चांगले शिजु द्यावे. मिश्रण अर्धे झाल्यावर गॅस बंद करावा. हे मिश्रण सकाळ-संध्याकाळ अर्धे-अर्धे एक कप दूधात मिक्स करुन प्यावे. याव्यतिरिक्त 100 मिली दूधात 2-4 ग्रॅम ज्येष्ठ मध आणि 5-10 ग्रॅम साखर मिक्स करुन रोज बाळंत स्त्रीला सकाळ- संध्याकाळ प्यायला द्यावे. या उपायाने दुध जास्त तयार होते व बाळाचे पोट भरते.


• अनेक महिला आणि मुलींना मासिक पाळी दरम्यान अतिरक्तस्त्रावाची समस्या होत असते. काही महिलांना मासिक पाळीमध्ये जास्त दिवस अंगावरुन रक्तस्राव होतो. ज्यामुळे महिलांचे आरोग्य खालवते. मासिक पाळीसंबंधी सर्व समस्या तसेच जास्त प्रमाणात रक्तस्राव होण्याची समस्या असेल तर नियमित १ चमचा जेष्ठमध पावडरचे सेवन करावे किंवा 1-2 ग्रॅम ज्येष्ठमध चूर्णामध्ये 5-10 ग्रॅम साखर मिसळुन तांदुळाच्या धुवनाच्या पाण्यात मिसळुन प्यायला द्यावे.


• जखमा, व्रण, घाव लवकर बरे न झाल्यास त्या जागी सुज येते, पु तयार होतो, कधीकधी जखमा चिघळतात लवकर जखम भरुन येत नाहीत. याकरता उपाय म्हणुन ज्येष्ठ मधाचे सेवन करावे. जेष्ठमध चूर्ण तुपात मिसळुन हलके गरम करुन जखमांवर लावावे. यामुळे जखमा लवकर बर्‍या होतात. तसेच भाजल्यानंतर अंगावर फोड़ आले असतील तर त्यावर जेष्ठमधाचा लेप लावल्याने फोड लवकर पिकुन फुटुन जातात.


• जर आपल्याल‍ा देखील शरीराला कायम घामाचा दुर्गंध येत असेल व अनेक उपाय व परफ्युम वापरुन देखील फरक पडत नसेल तर ज्येष्ठमधाचा वापर करुन पहा.


• जेष्ठमधाची पावडर पाण्यात दळुन उटण्यासारखे अंगाला चोळावे व त्यानंतर अंघोळ करावी. हा उपाय नियमित केल्याने अंगाला येणारा घामाचा दुर्गंध पूर्णपणे नाहीसा होतो.


• दीर्घ आजारपण किंवा शारीरिक व अंगमेहनतीची कामे जास्त केल्यामुळे येणार्‍या थकव्यामुळे जर आपण अशक्त झाला असाल तर दररोज १ चमाचा जेष्ठमधाचे चुर्ण अर्धा चमचा मध व १ चमचा तुपासोबत घ्यावे. ५ते ७ आठवडे दररोज सकाळ-संध्याकाळ हे चुर्ण दुधासोबत सेवन केल्यास शरीरात बळ येते व ताकद वाढते.


• एक चमचा जेष्ठमध चूर्ण तूपामध्ये मिसळुन दिवसातून सकाळ दुपार संध्याकाळ असे 3 वेळा सेवन केल्यास मिरगी येणे किंवा फीट येणे या आजारांमध्ये लाभ होतो. याशिवाय 5 ग्रॅम जेष्ठमध पावडर पेठ्याच्या रसात मिसळुन सलग 3 दिवस खाल्ल्याने मिरगी व फीटच्या आजारात आराम मिळतो.

टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page