डोकेदुखी दूर करण्याचे घरगुती उपाय
- divipawar94
- May 16, 2021
- 4 min read

डोकेदुखी एक खूप सामान्य आजार आहे. जो कोणालाही आणि कधीही होण्यास सुरुवात होते. याचा वेळीच इलाज न केल्यास त्याचे वाईट परिणाम शरीरावर होतात. डोकेदुखी होण्यास सुरुवात झाल्यावर काय करावे याच्यासाठी काही उपाय दिलेले आहेत. या उपायांचा अवलंब केल्यास तुमची डोकेदुखी नक्की थांबेल. पेनकिलर घेतल्याने डोकेदुखी थांबते पण असा गोष्टी सतत केल्याने म्हणजेच डॉक्टरांच्या सल्ल्याविनाच गोळ्या घेतल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यासाठी खाली दिलेले आयुर्वेदीक उपाय वापरा.
1) आलेयुक्त चहा हा स्वादालाही चांगला लागतो आणि डोकेदुखीत आराम देतो. आलेयुक्त चहामुळे शरीरामधील रक्तवाहिन्यांतील सूज कमी करण्यास मदत होऊन वेदना कमी होते. त्यामुळे दररोज आलेयुक्त चहा पिण्याची सवय लावा. त्यानं सामान्य आरोग्यही चांगलं राहातं. डोकेदुखी दूर पळवण्यासाठी एक टीस्पून लिंबाचा रस आणि तेवढाच आल्याचा रस एकत्र करून ते मिश्रण सेवन करावं. दिवसातून दोनदा हे मिश्रण घेतल्याने डोकेदुखी दूर पळते. आल्याचा दुसरा उपाय करताना आल्याची एक चमचा पेस्ट बनवून त्यात दोन चमचे पाणी मिसळावं आणि ती पेस्ट कपाळावर लावावी. काही वेळानंतर कोमट पाण्याने धुवून टाकावी.
2) पुदिन्याची पानं आणि पुदिन्याच्या तेलात मेंथॉल असतं. ते मेंदुतील रक्तवाहिन्यांना मोकळं करण्यासाठी फायदेशीर ठरतं. एक चमचा जैतूनच्या तेलात पुदिन्याचा तेवढाच रस मिसळावा. त्यानंतर तो लेप कपाळाला लावल्यास डोकेदुखी गायब होते.
3) शरीरातील पाणी कमी झाल्यानं म्हणजे डिहायड्रेशनमुळे बरेचदा डोकेदुखी होते. अशावेळेस तुळशीच्या पानांचा रस गुणकारी ठरतो. पेलाभर पाण्यात तुळशीची 10-15 पानं घालून ते उकळून घ्या. जास्त उकळल्यानंतर उरलेलं निम्मं पाण्यात एक चमचा मध मिसळा आणि प्या. शिवाय यापुढे कधी अचानक डोके दुखायला लागल्यास भरपूर पाणी प्या. कारण भरपूर पाणी प्यायल्याने सुद्दा डोकेदुखीवर मात करता येते.
4) दालचिनी भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म असतात. डोकेदुखीची समस्या जाणवेल तेव्हा दालचिनीचे दोन-तीन तुकडे घेऊन त्यांचं चूर्ण करावं. त्यात थोडं पाणी मिसळून त्याची घट्ट पेस्ट तयार करावी आणि ती कपाळाला लावावी. हा लेप साधारण अर्धा तास राहू द्यावा, त्यानंतर कोमट पाण्याने धुवून टाकावं.
5) अनेकदा नसांच्या किंवा स्नायूंच्या ताणामुळे डोकेदुखी होते. अनेकदा पाठीचा वरचा भाग, मान, खांद्यावर ताण पडल्यास डोकं दुखतं. त्यामुळेच साधेपणानं मानेचं स्ट्रेचिंग केल्यानं डोकेदुखीवर आराम मिळतो. मान डावीकडे-उजवीकडे, वर-खाली सावकाशपणे फिरवल्यास शरिरातील अनेक स्नायूंची हलचाल होऊन ते थोडे मोकळे होतात. मात्र अशाप्रकारे स्ट्रेचिंग करुन व्यायाम करताना मानेला लचका बसणार नाही याची काळजी घ्यावी.
6) डोके दुखत असताना बऱ्याच लोकांना तीव्र उजेडाचा प्रचंड त्रास होतो. रस्त्यावरचे लाईट, कॉम्पुटर स्किनचा उजेड किंवा मोबाईल फोनचा ब्राईटनेस हे सुद्धा डोकेदुखी वाढवण्यासाठी कारणीभूत असतात. त्यामुळे डोके दुखत असताना तीव्र उजेड टाळणे हे फायदेशीर असते. अंधाऱ्या खोलीत मंद प्रकाशाचा दिवा लावून शांत बसणे हा डोकेदुखीवरचा साधा, सरळ आणि सोपा उपाय आहे.
7) पित्तामुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो त्यामुळे पित्त होऊ न देणे हा डोकेदुखी टाळण्याचा एक महत्वाचा उपाय आहे. आपल्या खाण्यातून नकळतपणे पित्तकारक पदार्थ जात असतील तर त्याकडे लक्ष देणे गरजेचे असते. उदाहरणार्थ. काही लोकांना खूप शेंगदाणे किंवा दाण्याचे कूट घालून केलेले पदार्थ खाल्ले तर पित्ताचा त्रास होतो. ज्यामुळे डोके दुखते. अशा लोकांनी शेंगदाणे टाळलेलेच बरे असतात. प्रत्येकासाठी शेंगदाणे हाच प्रॉब्लेम असेल असे नाही त्यामुळे असे कोणते पदार्थ आहेत ज्यामुळे आपल्याला पित्त होते ते ओळखले पाहिजेत व ते कटाक्षाने टाळले पाहिजेत.
8) डोकेदुखी घालवण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे लवंग. तव्यावर काही लवंगा शेकून घ्या. त्यानंतर गरम असतानाच या लवंग रुमालात बांधून घ्या. त्यानंतर या रुमालातून येणारा गरम लवंगांचाचा वास घेत राहा. दोन चमचे खोबरेल तेल त्यामध्ये एक चमचा मिठ आणि चार-पाच थेंब लवंग तेल मिसळून ते हलक्या हाताने कपाळाला लावावं. याने त्वरीत आराम मिळतो. यामुळे डोकेदुखीचा त्रास नक्कीच कमी होईल.
9) सर्दी, खोकला किंवा सायनसमुळे डोकेदुखीचा त्रास होत असेल तर एक चमचा ओवा भाजून तो सुती कपड्यात बांधावा आणि वेदना होत असलेल्या ठिकाणी त्याने शेकावं. यामुळे डोकेदुखीचा त्रास कमी होतो.
10)अॅक्युप्रेशर हा अनेक आजारांवरील उपाय आहे. अंगठा आणि तर्जनी म्हणजे पहिल्या बोटाच्या मधल्या भागात असलेल्या स्थायूंवर एक मिनिटापर्यंत दाब द्या. अशाप्रकारे स्नायूवर योग्य प्रमाणात दाब दिल्यामुळे डोकेदुखीपासून सुटका होईल.
11)सलग नीट झोप न होणे, झोपच न लागणे, पुरेशी झोप न होणे किंवा अति प्रमाणात झोपणे या सगळ्यामुळे डोकेदुखी होऊ शकते त्यामुळे झोपेचे गणित नीट जमणे हे अत्यंत महत्वाचे आहे. आपल्याला सात ते नऊ तास झोप गरजेची असते त्यामुळे आपण आपल्या दिवसाचे रुटीन व्यवस्थित बसवले पाहिजे व कामाची आखणी आपल्या झोपेच्या वेळेत येणार नाहीत अशी केली पाहिजे. झोप न येण्याचे अजून एक कारण म्हणजे अतिरिक्त टेन्शन किंवा स्ट्रेस, त्यामुळे व्यवस्थित झोप होण्यासाठी या गोष्टींवर सुद्धा काम केले पाहिजे.
12)काही प्रयोगात असे सिद्ध झाले आहे की कॉफीनच्या प्रमाणात केलेल्या सेवनामुळे डोकेदुखी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आपण कॉफी, शीतपेय ह्या गोष्टींचे सेवन करून आपली डोकेदुखी कमी करू शकतो. मात्र कॉफीनचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्याने आपली झोप कमी होते आणि त्यामुळे पुन्हा डोकेदुखी सुरू होते. त्यामुळे कॉफीनचे सेवन करताना ते ठराविक प्रमाणात करणे गरजेचे आहे.
13)काही केमिकल किंवा उग्र वासाची अत्तरे ह्यामुळे सुद्धा डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता असते. असा तीव्र वास जर जास्त वेळ आपल्याला येत राहिला तर त्यामुळे आपल्याला डोकेदुखी सुरू होते आणि जोपर्यंत आपण त्या वासापासून दूर जात नाही तोपर्यंत आपली डोकेदुखी कमी होत नाही. त्यामुळे जर कधी अशा ठिकाणी जाणे अनिवार्य असेल तर मास्कचा वापर करणे सर्वात चांगले असते.
14)शरीरातील आम्लांचं प्रमाण कमी अधीक झाल्यास डोकेदुखी होते. अशाप्रकारची डोकेदुखी असल्यास लिंबूपाण्यात थोडं मीठ किंवा खाण्याचा सोडा घालून ते प्यावं. लिंबू पाण्यामुळे शरीरातील आम्लांच (अॅसीडचं) प्रमाण संतुलित होतं.
15)अनेकदा डोक्यामधील नसांना सूज असल्यामुळेही डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे कपाळ आणि कानाच्या जवळच्या भागावर बर्फाचा शेक दिल्यास फायद्याचे ठरते. एकंदरीत कोणता ऋतू आहे आणि वातावरणाचा अंदाज घेऊन शेक घ्यायचा की नाही, हे ठरवावे.
16)डोकेदुखी असताना पाणीदार फळे खाणे फायद्याचे ठरते. त्यामुळेच टरबुजसारखं पाणीदार फळ खाल्यास वर नमूद केल्याप्रमाणे डिहायड्रेशनपासून होणाऱ्या डोकेदुखीपासून मुक्तता मिळते. त्यामुळे टरबुज किंवा अन्य पाणीदार फळांचा आपल्या आहारात नियमित समावेश असल्यास ते आरोग्यासाठी फायद्याचे असते.
17)ऑक्सिजनची कमतरता हेही डोकेदुखीचे एक कारण असू शकते. त्यामुळे डोके दुखत असल्यास जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळेल अशा भरपूर झाडं असलेल्या भागात एखादा फेरफटका मारावा. हा फेरफटका मारताना मोठ्याने श्वास घ्यावा आणि सोडावा. डोकेदुखी नक्कीच कमी होते.
टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments