top of page
Search

दंतधावन व जिव्हानिर्लेखन

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • Jun 26, 2021
  • 2 min read



दंतधावन


दंत म्हणजे दात व धावन म्हणजे धूणे किंवा स्वच्छ करणे. ही क्रिया सकाळी व काही खाल्ल्यावर करावयास सांगितली आहे. यासाठी स्वच्छ जागी उगवलेल्या विशिष्ट झाडांच्या काडीचा वापर करावा. यासाठी कडूलिंब, खैर, आंबा, बाभळी, मोह, करंज या झाडांची काडी वापरावी. ही काडी त्या व्यक्तीच्या करांगळी एवढी जाड व बारा बोटे लांब असावी. या काडीचे समोरचे टोक दातांनी चावून अथवा दगडाने ठेचून नरम करावे. अश्या पद्धती तयार केलेल्या काडीला ‘दंतपवन’ असे म्हणतात. या दंतपवनाने हिरड्यांना इजा होणार नाही अशा पद्धतीने दात साफ करावे. प्रथम खालचे दात साफ करावे व नंतर वरचे दात साफ करावे. हे करीत असताना मौन धारण करावे असे सांगितले आहे. यानंतर सुंठ, मिरे, पिंपळी, हिरडा, बेहडा, आवळा, विलायची, दालचिनी, जायपत्री यांपैकी तिघांचे चूर्ण मधात मिसळून हळूहळू दातांवर चोळण्यास सांगितले आहे. दातांवर चोळण्याच्या या क्रियेला ‘प्रतिसारण’ असे म्हणतात. दातांवर प्रतिसारण करण्यासाठी तेल व सैंधव यांचाही वापर करण्यास सांगितला आहे. जीभ स्वच्छ करण्याच्या कृतीला जिव्हानिर्लेखन असे म्हणतात. दात स्वच्छ केलेल्या काडीनेच हळूहळू जीभ साफ करावी. पण यासाठी त्या काडीच्या मऊ व गुळगुळीत बाजूचा वापर करावा किंवा दुसरी गुळगुळीत, मऊ काडी घ्यावी. तसेच जिव्हानिर्लेखनासाठी सोन्याची किंवा चांदीची बारा बोटे लांब पट्टी वापरण्यास सांगितले आहे.



जिव्हानिर्लेखन


वरील दोन्ही क्रियांमुळे तोंड, दात, जीभ स्वच्छ होतात. तोंडाला चव येते, जीभेच्या ठिकाणी हलकेपणा जाणवतो, तोंडाचा दुर्गंध नाहीसा होतो. यानंतर तोंड, चेहरा, डोळे कोमट पाण्याने स्वच्छ धूवावे. ग्रीष्म व शरद ऋतूंत थंड पाणी वापरावे. दातांना आणखी मजबूत करण्यासाठी यानंतर तूपाचा गंडूष करावा. यानंतर रोज डोळ्यांमध्ये औषधांपासून तयार केलेले अंजन म्हणजेच काजळ घालण्यासही सांगितले आहे. दंतधावन हा केवळ रोज करण्याचा उपक्रम नसून तो रोगाच्या उपचारार्थ करावयाचाही उपक्रम आहे. तापानंतर तोंडात कधी कधी वेगळीच कुठलीतरी चव असते. अशावेळी त्या चवीच्या विरूध्द चव असलेल्या झाडाच्या दंतपवनाने रोग्याला दंतधावन करावयास सांगितले आहे. ज्यामुळे तोंडाची चव पूर्ववत येते. अपचन, खोकला, उलट्या, दम लागणे, तोंडाचा लकवा, तोंड येणे, खूप ताप येणे अशावेळी दंतधावन करू नये असे आयुर्वेदात सांगितले आहे.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page