नेत्रतर्पण
- divipawar94
- Jun 26, 2021
- 2 min read

नेत्र म्हणजे डोळे व तर्पण म्हणजे तृप्ती. डोळ्यांवर बाहेरून करण्याची ही उपचार पद्धती आहे. यामुळे डोळ्यांना व दृष्टीलाही आरोग्य प्राप्त होते. दिसण्याची क्रिया व्यवस्थित झाल्याने डोळे तृप्त होतात, म्हणून नेत्रतर्पण हा शब्दप्रयोग केला आहे. पुटपाक ही नेत्रतर्पणानंतर करावयाची क्रिया आहे, जी थोड्याफार फरकाने नेत्रतर्पणासारखीच आहे. डोळे रुक्ष किंवा कोरडे असल्यास, प्रकाश असहिष्णुता, दृष्टीदोष, डोळ्यांवरील ताण, वयानुसार होणारी दृष्टीहानी यांमध्ये नेत्रतर्पण केले जाते. नेत्रतर्पणामुळे डोळ्यांचे पोषण होऊन त्यांची ताकद वाढते. ज्या रुग्णाला नेत्रतर्पण द्यायचे असेल त्याला त्याचे जेवण पचल्यावर शांततेत, वारा, ऊन, धूर, धूळ येणार नाही अशा खोलीत झोपवले जाते. उडदाचे पीठ पाण्याने भिजवून त्याचा घट्ट गोळा तयार केला जातो. त्याची डोळ्यांभोवती म्हणजेच डोळ्यांची खोबणी व भुवई यांना पूर्णपणे वेढणारी एक पाळ बांधली जाते. या पाळीची उंची दोन बोटे एवढी असते. या पाळीमुळे डोळ्याभोवती एक खळगा तयार होतो. या खळग्यात सहन होईल इतपत कोमट औषधियुक्त तूप धार धरून ओतले जाते. पापण्यांचे व भुवयांचे केस बुडतील इतके औषध त्या खळग्यात भरले जाते व रोग्याला हळूवारपणे डोळ्याची उघडझाप करावयास सांगितले जाते. औषध किती वेळ तसेच ठेवावे हे कोणत्या प्रकारचा आजार झाला आहे त्यानुसार ठरते. औषध धरून ठेवण्याचा कालावधी मात्रांच्या परिभाषेत मोजला जातो. एक मात्रा म्हणजे निरोगी व्यक्तीला आपसूकपणे एकदा डोळ्याची उघडझाप करावयास लागणारा वेळ. हा कालावधी शंभर ते हजार मात्रा एवढा असू शकतो. ठराविक मात्रा झाल्या की, डोळ्यांभोवतीच्या पाळीला कानाकडील बाजूस एक छिद्र केले जाते व त्यामुळे त्यातून औषध बाहेर निघते. उडदाची पाळ काढून टाकून डोळा बाहेरून साफ केला जातो. यासाठी यवाचे (सातूचे) पीठ पाण्यात भिजवून तयार केलेला गोळा डोळ्यावरून फिरविला जातो ज्यामुळे डोळा बाहेरून स्वच्छही होतो व चोळलाही जातो. नेत्रतर्पणानंतर धूमपान नावाची क्रिया रुग्णास करावयास सांगितली जाते. या क्रियेनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून रोग्याला जेवण दिले जाते. निरोगी व्यक्तीतही नेत्रतर्पण दिले जाते. नेत्रतर्पण सकाळी किंवा संध्याकाळी दिले जाते. नेत्रतर्पणामुळे डोळ्यांना एक प्रकारचा थकवा येतो तो दूर करण्यासाठी पुटपाक नावाची क्रिया केली जाते. ही क्रिया देखील नेत्रतर्पणाप्रमाणे डोळ्यांभोवती पाळ बांधून केली जाते. फक्त त्यासाठी वापरले जाणारे औषध अतिशय विशिष्ट पद्धतीने तयार होते. यासाठी कुटून कुटून बारीक केलेला ठराविक मांसाचा गोळा व औषधींचा लगदा एकत्र करून एका विशिष्ट पानात बांधले जाते. त्या पुरचूंडीवर चिनीमातीचा थर चढविला जातो. तो वाळल्यावर ती पुरचूंडी विस्तवात भाजली जाते. नंतर मातीचा थर दूर करून शिजलेले आतले औषध पिळून काढल्यावर जो रस मिळतो तो डोळ्यांभोवतीच्या खळग्यात भरला जातो. इतर सर्व क्रिया नेत्रतर्पणाप्रमाणेच असते. नेत्रतर्पण व पुटपाक या दोन्ही क्रियांनंतर डोळ्यांवर मोगरा व मालतीची फुले बांधतात.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments