top of page
Search

पंचकर्म म्हणजे काय ?

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • May 10, 2021
  • 3 min read

'स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम् आतुरस्य व्याधीपरिमोक्षणम्।"

जे स्वस्थ आहेत म्हणजे व्याधी मुक्त आहेत त्यांच्या स्वास्थाचे रक्षण करणे व जे आजारी आहेत त्यांच्या रोगाचे निवारण करणे हे आयुर्वेदाचे मुख्य प्रयोजन आहे. अशा या आयुष्याचा सर्वांगीण व वैज्ञानिकदृष्टीने विचारकरणारे शास्त्र म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेदात प्रामुख्याने दोन प्रकारची उपचार पद्धती अवलंबली जाते.

1) शमन चिकित्सा: प्रकुपित झालेल्या दोषांना शरीराबाहेर न काढता चूर्ण, वटी इत्यादी स्वरूपाची औषधोपचार करून शरीरात साम्य अवस्थेत आणणे होय.

2) शोधन चिकित्सा - ज्यामुळे दोषांना शरीराबाहेर काढून टाकले जाते. त्या चिकित्सा पद्धतीला शोधन असे म्हणतात,

पंचकर्म (पंच' - पाच, "कर्म - क्रिया) ही आयुर्वेदाची एक वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा आहे. प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली ही उपचारपद्धती आहे. यामध्ये रोग बरा करण्यासाठी एखादे औषध देऊन तो रोग शरीरातून बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे रोग समूळ नष्ट होतो. अशा रीतीने रोग शरीरातून बाहेर काढून टाकण्याच्या प्रक्रियेला शोधन क्रिया म्हटले जाते. मात्र त्याचबरोबरच बृहन, लंघन, स्नेहन, रुक्षण, स्वेदन व स्तंभन हे सहा उपक्रमही केले जातात. परंतु पंचकर्म उपचारात वमन, विरेचन, बस्ती, नस्य व रक्तमोक्षण हे प्रमुख व अत्यंत महत्त्वाचे असे उपचार आहेत.

पंचकर्म (Panchakarma) ही क्रिया तीन टप्यात केली जाते.

A) पूर्वकर्म

B) प्रधान कर्म

C) पश्चात कर्म

A) पूर्वकर्म

पूर्वकर्म म्हणजे आपण पंचकर्मात प्रधान कर्मासाठी आपले शरीर तयार करतो यात प्रामुख्याने "सेहन' आणि “स्वेदन' येते. स्नेहन म्हणजे शरीरात स्निग्ध गुण उत्पन्न करणे यासाठी तुप किंवा तेलाचे सेवन करणे व शरीराला तेल लावणे यांचा समावेश होतो. स्नेहनानंतर स्वेदन हा उपक्रम केला जातो.यामध्ये शरीराला औषधी वनस्पतींची वाफ देऊन घाम आणला जातो.

B) प्रधान कर्म

1) वमन - साध्या भाषेत सांगायचे म्हटले तर उलटी करणे होय. स्नेहन, स्वेदन करून दोष पोटात आणले जातात व नंतर औषधी द्रव्ये पाजून त्यांना मुखावाटे बाहेर काढले जाते हा उपक्रम प्रामुख्याने कफ दोषांवर लाभदायी आहे.

2) विरेचन – खालच्या बाजूने म्हणजे मलमार्गाने दोषांना रेचक औषधांचा वापर करून बाहेर काढणे म्हणजे विरेचन.विरेचन हा वाढलेल्या पित्तदोषाचा प्रमुख उपचार आहे.अनेक प्रकारचे त्वचारोग ज्यात लालीजळजळ असते ,पित्ताची डोकेदुखी,आंगावर गांधी उठण ,काही प्रकारचे अर्श (पाईल्स) ,कावीळ तसेच ज्या रोगात विकृत पित्त वाढलेले आहे अशात विरेचन दिले जाते. याच्यातही मलवेगाची त्याच्या स्वरूपाची नोंद ठेवली जाते

3) बस्ती - बस्तीला अर्ध चिकित्सा' असे म्हणतात. बस्ती ही वात रोगांसाठी विशेषकार्य करणारा उपक्रम आहे. आता मात्र प्लॅस्टिक, धातुंचे बस्ती यंत्रमिळतात यात गुदावाटे औषधी तेल, काढे आत सोडले जातात. तेल आतडयात शोषले जाऊन काही आवश्यक घटकांचा पुरवठा होतो.अनेक वातव्याधी (सांधेदुखी, कंबर दुखी),हाडांचे रोग,आतड्यातील विकार, त्वचारोग यात बस्ती ची उपाययोजना केली जाते.

4) नस्य – नस्य म्हणजे नाकात औषधी तेलाचे थेंब किंवा चूर्ण टाकणे.मानेच्या वरच्या अवयवांचे आरोग्य सुधारण्यास, सायनस मोकळे होण्यास, काही प्रकारच्या डोकेदुखीत नस्याचा उपयोग होतो.ज्या आजारांचा मेंदूशी जवळचा संबंध आहे अशात (पक्षाघात , अर्दीत (facial palsy) याचा बराच चांगला उपयोग होतो.

5) रक्तमोक्षण - यात दुषित रक्त शरीराबाहेर काढले जाते. रक्तदुष्टी असल्यास हा उपक्रम उपयोगी ठरतो यात जळु लावणे, शिरेवाटे दुषित रक्त काढणे इत्यादी समावेश होतो.

C) पश्चात कर्म –

पथ्याचे पालन करणे हे यात मोडते. वमन विरेचनात दोष एकत्र करून पोटात आणले जातात व नंतर ते बाहेर काढले जातात. हे करताना रुग्णास तीव्र स्वरुपाचा अग्निमांद्य होतो. हा अग्नी वाढवण्यासाठी हळूहळू हलक्या आहारापासून म्हणजे पेय, पातळ खिचडी असे क्रमाक्रमाने वाढवत नेऊन गुरू आहारापर्यंत म्हणजे नेहमीचे जेवणापर्यंत आहार, हळूहळू वाढवयाचा असतो. यास"संसर्जन क्रम' असे म्हणतात. तसेच बस्ती नस्य व रक्तमोक्षण नंतरही त्या-त्या कर्मानुसार पथ्य पाळावयाचे असतात.

पंचकर्म (Panchakarma) कोणी करावे?

• बहुदोषी – म्हणजेच शरीरात खूपदोष वाढल्यामुळे व्याधींनी ग्रस्तआहेत,

• औषधोपचार करूनही ही व्याधी पुन्हा होतो,

अशा रुग्णांनी तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेऊन आपल्या रोगानुसार पंचकर्म(Panchakarma) करून घ्यावे, विविध ऋतुनुसार जसे वातावरणात बदलघडतो. त्यानुसार शरीरातही बदल घडतात. त्या-त्या ऋतुनुसार शरीरातील दोषांमध्ये बदल होतात. वर्षाऋतूत वात अधिक, शरदात पित्त तर वसंतात कफ या ऋतुनुसार होणाऱ्या दोषप्रकोपातून वाचण्यासाठी आचार्यांनी पंचकर्माचा (Panchakarma) सल्ला दिला आहे.

पंचकर्म (Panchakarma) कोणी करू नये?

क्षीण, बालक,गरोदर स्त्रिया व अती वृद्धांना देऊ नये.

पंचकर्मात (Panchakarma) काय टाळावे?

खूप प्रवास, खूप चालणे, एकाच ठिकाणी खूप वेळ बसून राहणे, अत्याधिक जेवण करणे, दुपारी झोपणे, मैथुन टाळावे, ब्रह्मचर्याचे पालन करावे, मानसिक ताण इत्यादी सारख्या गोष्टी टाळाव्यात.

पंचकर्माचे (Panchakarma) फायदे ?

पंचकर्माने रोग शरीरातून समूळ नष्ट होतो. परंतु काही इतरही याचे फायदेआहेत. शरीरात अग्नी प्रदीप्त होतो. शरीराला व मनाला स्वस्थता मिळते. इंद्रिये प्रसन्न होतात. मन व बुद्धी आपापल्या कार्यांमध्ये उत्कर्ष करतात. शरीराचा वर्ण व कांती उजळते. त्वचा तजेलदार दिसू लागते. कार्यशक्ती म्हणजे स्टॅमिना वाढतो. शरीर पुष्ट व भारदार होते. वृद्धावस्था लवकर येतनाही. संतती नसलेल्यांना संततीप्राप्ती होते. निरोगी अवस्थेत दीर्घायुष्य मिळते. पंचकर्म उपचार तज्ज्ञ व्यक्तिच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावा. त्याने दुष्पपरिणाम होत नाहीत. हे सर्व फायदे मिळवायचे असतील तर पंचकर्म उपचार वर्षातून किमान एकदा तरी करून घेतलाच पाहिजे.

पंचकर्माचे (शोधन) चिकित्सेचे महत्त्व -

शोधन व शमन या चिकित्साप्रकारांपैकी शोधन चिकित्सा ही श्रेष्ठ आहेहेच चरकादी ग्रंथांतून स्पष्ट केलेले आहे.

'दोषाः कदाचित्कुप्यति जिता लंघनपाचनैः।

ये तु संशोध न तेषां पुनरुद्भवः।।'

सू. १६/२७- अ. ह. सू. ४/२७


शमनामुळे दोषांना साम्यावस्था प्राप्त होते हे खरे, पण थोडेसे जरी कारण मिळाले तरी दोष हे पुन्हा प्रकुपित होण्याची शक्यता असते. याउलट जेव्हा शोधनोपचार केले जातात तेव्हा दोष शरीराबाहेर काढून टाकले जात असल्याने पुन:पुन्हा दोषप्रकोप होऊ शकत नाही व म्हणूनच शोधनोपचार हे शमनोपचारापेक्षा श्रेष्ठ आहेत.

टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT (Diploma In Yoga Teacher)

[योग शिक्षिका]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page