पथ्य अपथ्य
- divipawar94
- Dec 15, 2021
- 2 min read
पथ्य अपथ्य म्हणजे नक्की काय तर ;
एखादा आजार झाला की डॉक्टर आहारात काय घ्यावे काय काय घेऊ नये हे सांगतच असतात. एखादा आजार झाला की सर्वांचे सल्ले देणे सुरु होतात. याचा अनुभव प्रत्येकाने घेतला असेलच. पथ्य अपथ्य म्हणजे नेमके काय ? आयुर्वेदात पथ्यापथ्य हा खूप उपयुक्त, प्रत्येक आजारानुसार सांगितलेला एक सिद्धांत आहे. आयुर्वेद शास्त्राचे हे वैशिष्ट्य आहे. हजारो वर्षापूर्वी लिहिलेल्या ग्रंथात रुग्णांची चिकित्सा फक्त औषधे देऊन होणार नाही तर आहारात बदल करणे आवश्यक ठरेल. निरोगी व्यक्तींनी स्वास्थ्य टिकविण्याकरीता काय घ्यावे तसेच रुग्णांनी आहारात काय घ्यावे किंवा घेऊ नये हे पथ्यापथ्य संकल्पनेत सांगितले आहे.
पथ्य म्हणजे काय
जे आहारादि द्रव्य, पदार्थ पथात ( शरीराच्या स्रोतसांमधे) अपकार वा हानि करणार नाही तसेच मनाला प्रिय असेल म्हणजेच आवडणारे असेल त्याला पथ्य म्हणतात. याउलट जे आहारादि द्रव्य शरीराला हानि पोहचवतात मनाला प्रिय नसणारे अपथ्य समजले जातात. उदा. अन्न हे प्रत्येक व्यक्तीकरीता पथ्य आहे. प्रत्येकाला शरीराचे आरोग्य, बल टिकविण्याकरीता चांगले जेवण करावेच लागते पण हेच जेवण कितीही पौष्टीक असू द्या अति मात्रेत वा कमी प्रमाणात खाल्ले तर शरीराला घातकच ठरेल हो की नाही ? म्हणजे तेच पौष्टीक अन्न शरीराला घातक रोगकारक अपथ्यकर ठरते.
रोगांकरीता पण तसेच आहे.
ताप आला असेल तर भूक मंदावते खाण्याची इच्छा नसते जिभेला चव नसते त्यामुळे आहारात बदल करणे आवश्यक आहे. म्हणूनच तापेमधे पथ्य आहार स्वरूपात मूग, कुळीथ डाळीचे सूप घ्यावे. मूग चणा मसूर कुळीथ अशा विविध डाळींचे सूप त्यात अनारदाना काळी मिरे सुंठ सैंधव घालून बिना तेल तूप घालता रुचकर करून घ्यावे. तापाची लक्षणे असतांना रोजच्या सारखे जेवण हे अपथ्यच ठरणार. इथे पातळ ताजे सूप स्वरूपात अन्नच पथ्य आहे. मूळव्याध झाला असेल तर सूरणाची भाजी, जीरे सैंधव युक्त ताक घेणे हे पथ्यकर सांगितले आहे.
हिरड्याचे चूर्ण ताकात टाकून घेणे पोट साफ करणारे मूळव्याधीच्या वेदना कमी करतात. स्थौल्य अथवा लठ्ठपणा हा जर एका जागी बराचवेळ बसणे व्यायाम न करण्यामुळे येत असेल तर व्यायाम करणे अशा रुग्णामधे पथ्य विहार आहे. पचायला जड अन्न, अति तळकट मसालेदार अन्न घेण्याने जर लठ्ठपणा वाढत असेल तर साळीच्या लाह्या, यव( जौ, barley) या गोष्टींचा आहारात वापर पथ्य समजल्या जाते.
अशा प्रकारे विविध रोगांमधे रोग निर्माण होण्याच्या कारणानुसार आहारा विहारात बदल म्हणजेच पथ्य अपथ्य याचा विचार आवश्यक ठरतो. व्याधी ठिक झाल्यावर पुन्हा हळूहळू पौष्टीक नित्य आहारावर पूर्ववत येऊ शकतो. असा आहार जो पथ्य आहे शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करणारे असेल. बऱ्याचवेळा असे म्हटले जाते की आयुर्वेद तज्ज्ञ पथ्यच फार सांगतात पण आहार ही चिकित्सा पण आहे. कधी कधी फक्त आहारात बदल हे रोग ठिक करतात. उदा. पाणी शरीराला आवश्यक घटक आहे. तहान लागणे म्हणजे शरीराला पाण्याची गरज आहे हा शरीराचा संकेत तेव्हा पाणी पिणे महत्त्वाचे ते पथ्य आहे. परंतु अति पाणी पिणे तहान नसतांनाही सतत पाणी पिणे हे वारंवार होणाऱ्या प्रतिश्यायाचे (सर्दी) एक कारण आहे म्हणून अशा रुग्णांत जर हे कारण असेल तर तहान लागल्यावरच पाणी प्या अथवा सुंठ तुळस घालून पाणी प्या असे पथ्य सांगितले की थोड्या औषधीनी सुद्धा जुनाट सर्दी नाक वाहणे बंद होते. म्हणून पथ्य अपथ्याला महत्त्व आहे!




Comments