बस्ती
- divipawar94
- Aug 19, 2021
- 4 min read

आयुर्वेद हे शास्त्र शरीराचं स्वास्थ्य टिकविणं व काही आजार झाल्यास ते बरे करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. साधारणत: पाच हजार वर्षापासून आयुर्वेद हे शास्त्र जगामध्ये वापरलं जात आहे. विशेषत: आपल्या भारत देशासाठी असणा-या हवामानासाठी बस्ती अतिशय उपयोगी आहे. म्हणूनच त्याला देशी चिकित्सा असं म्हणतात. आयुर्वेदामध्ये शरीर आजारी न पडता स्वास्थ्य टिकवण्यासाठी दररोज आवश्यक असणारा आहार, व्यायाम, योग याचं संबंधित व्यक्तीनुरूप म्हणजेच प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळं प्रमाण सांगितलेलं आहे. एकमेव असं हे शास्त्र आहे जे प्रत्येक व्यक्तीसाठी असलेल्या गरजेनुसार स्वास्थ्य टिकवण्यासंबंधित चिकित्सा करते. बस्तीच्या संबंधी व्याख्या डब्ल्यूएचओने मान्य केलेली आहे. शरीरातील रोज होणारी झीज भरून काढण्यासाठी आपल्याला आहाराची आवश्यकता असते. त्यासाठी आपण दररोज परिपूर्ण आहार घेत असतो, तरीही वातावरणातील बदलामुळे (ऋतुमानानुसार) काही आजार उद्भवू शकतात. त्या आजारामध्ये सर्दी, खोकला, अतिसार, ताप, आम्लपित्त इ. विकारांचा समावेश होतो.
यासाठी आयुर्वेदामध्ये पंचकर्म – पाच चिकित्सांचा समूह, जसं की वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण अशा उपचार पद्धतींचा वापर केला जातो. पंचकर्म ही क्रमवार पद्धतीनं करण्याची चिकित्सा आहे. यामध्ये दोन पद्धतीनं चिकित्सा करतात.
पहिली चिकित्सा सर्वसामान्यांसाठी पंचकर्म किंवा ऋतुपरत्वे सर्वासाठी केलं जाणारं पंचकर्म.
१) पावसाळा – स्नेहन, बस्ती (वात)
२)उन्हाळा – विरेचन (पित्त), रक्तमोक्षण
३) हिवाळा – वमन, नस्य
दुसारी चिकित्सा म्हणजे आजारी व्यक्तींसाठी : आवश्यकतेनुसार पंचकर्मामधील एक अथवा मिश्र कर्म पद्धती चिकित्सा करण्यासाठी अवलंबली जाते.
जसा झाडाचा काटा पायात टोचला असता तो काढल्याशिवाय उपचार करून घेण्यात काहीच फायदा होत नाही, त्याप्रमाणेच त्या त्या ऋतूत शरीरामध्ये हवामान बदलामुळे वात, पित्त, कफ हे प्रमाणापेक्षा बाहेर वाढतात व आजार उत्पन्न करतात. वाढ झालेला दोष शरीराला अपाय करून विकार उत्पन्न करतो. म्हणून भारतामध्ये, भारतीय आयुर्वेद चिकित्सेनुसार पंचकर्म प्रत्येक व्यक्तीने त्या त्या ऋतूमध्ये करून शरीरातील दोष बाहेर काढले पाहिजेत. सर्वप्रथम आपण जाणून घेऊ पंचकर्म व बस्ती म्हणजे काय व त्याचं आपल्या शरीराच्या दृष्टीने काय महत्त्व आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या वाहनांची काळजी वेळच्या वेळी ऑइलिंग, सव्र्हिसिंग करून घेतो, त्याप्रमाणे शरीर स्वस्थ ठेवण्यासाठीसुद्धा वेळोवेळी त्याचं शुद्धीकरण होणं गरजेचं असतं. त्यासाठी सामान्य व्यक्तींनी अवश्य पंचकर्म करून घ्यावेत.
पंचकर्म फायदे
» आजार उत्पन्न करणारे वाढीव दोष बाहेर काढतात.
» स्वस्थ व्यक्तीची प्रतिकारशक्ती वाढते.
» शरीराचं पोषण घडतं.
» मलभाग बाहेर पडण्यास मदत होते.
बस्ती ही चिकित्सा पंचकर्म या क्रमवार (स्वस्थांसाठी) चिकित्सेमध्ये तिस-या क्रमांकाची चिकित्सा आहे. शरीरातील वातप्रधान विकारावर बस्ती चिकि त्सा अतिशय उपयुक्त ठरते. शरीरामध्ये असणा-या वातासंबंधित सर्वसामान्य भारतीयांना माहीत आहेच. वात, कफ, पित्त यापैकी वात दोष हा प्रभावशाली व सर्व दोषांवर, शरीरावर नियंत्रण करणारा आहे. म्हणून बस्ती चिकित्सा ही अर्धी चिकित्सा वा परिपूर्ण उपचार पद्धती संबोधली जाते. बस्ती संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ मूत्राशय असा आहे. पूर्वी मोठय़ा प्राण्यांचं मुत्राशय बस्ती देण्यासाठी वापर करीत होते. म्हणूनच यास बस्ती हे नामकरण झालं.
बस्ती विशेषत: खालील विकारांवर कार्य करते.
» अनरिस्पॉन्सिव्ह डिसऑर्डर (Unresponsive disorders (todays)
» न्युरॉलॉजिकल डिसऑर्डर (Neurological disorders)
» मस्क्युलोस्केलेट डिसऑर्डर (musculoskeletal disorders)
» मेंटल डिसऑर्डर (mental disorders)
सध्याच्या काळात आधुनिक आयुर्वेदात (एल्ली) एने हा शब्द खूप प्रसिद्ध आहे. त्याचा अपव्यय वा मराठी शब्द म्हणून एनिमा संबोधतात. ते चुकीचे आहे. एनिमा हा केवळ सफाईचं काम करतो. परंतु आयुर्वेदामध्ये दिलेली बस्ती ही शरीराचं पोषण, प्रतिकारशक्ती व आजार कमी करणं या गोष्टी एकत्रितपणे करते जे एनिमा करत नाही. वर्षाऋतूमध्ये हवामानाच्या बदलानुसार शरीरात वात वाढून शरीर क्षीण होतं व आजाराची प्रबलता वाढते. संसर्गाचं प्रमाण वाढतं. ते टाळण्यासाठी सर्वसामान्य माणसांनी बस्ती घ्यावी.
बस्ती देण्याचे प्रकार : बस्ती ही कोणत्या मार्गाने दिली जाते व त्यात असणा-या द्रव्यानुसार प्रकार पडतात.
» गुदमार्ग : Rectum» आस्थापना बस्ती – Decoction (काढा) Basti
आस्थापन बस्ती हा प्रकार मुख्य असून तो सर्वाधिक वापरला जातो. आस्थापन म्हणजे शरीरामध्ये स्वास्थ्य स्थापन करणं. यामध्ये वानस्वातिक काढा, तेल, मध यांचं मिश्रण वापरलं जातं.
साधारण मात्रा – ९६० मिली
या प्रकारात रुग्णाला डाव्या कुशीवर झोपवून उजवा पाय गुडघ्यामध्ये दुमडून हळूवारपणे बस्तीयंत्राद्वारा बस्ती दिला जातो. सकाळी मलविसर्जन झाल्यानंतर आस्थापन बस्ती दिली जाते. ती व्यक्तीनुसार कमी-अधिक मात्रेत दिली जाते. आस्थापन बस्ती दिल्यानंतर ती ४८ मिनिटांमध्ये शरीराबाहेर आलीच पाहिजे, असा नियम आहे. तशी ती शरीराबाहेर न आल्यास त्यासाठी वेगळी चिकित्सा करावी लागते.
बस्तीचं महत्त्व
शरीराचं पोषण हे आतडय़ांमधून शोषित पोषक द्रव्यांद्वारा होत असतं. आतडय़ांचं आरोग्य चांगलं असेल तर पोषकद्रव्य जास्तीत जास्त प्रमाणात व त्वरित शोषण होतात. हे सर्व शरीराची पचनशक्ती जेव्हा व्यवस्थित असेल तेव्हाच शक्य होतं. या दोन्हीवर बस्ती पद्धती उत्तम काम करते. यात गुदमार्गातून सरळ आतडय़ांमध्ये तेलयुक्त औषधीद्रव्यं जाऊन ती त्वरित शोषली जाण्यास मदत होते. ही औषधीद्रव्य संपूर्ण शरीरात पसरतात व दोष बाहेर काढतात व शरीराचं पोषण करून आजार बरा करतात. म्हणूनच गुदमार्गाने दिलेली बस्ती त्वरित काम करते.
» अनुवासन बस्ती : medicated oil Basti
ही बस्ती बळ वाढवणारी तेल बस्ती म्हणून प्रसिद्ध आहे. ही रात्रीच्या वेळी जेवणानंतर दिली जाते. ती बालकांपासून ते वृद्ध माणसांमध्ये वापरली जाते.
मात्रा / प्रमाण – २४० मिली साधारणपणे
मात्रा बस्ती -ही अतिशय कमी प्रमाणात गुदमार्गाने दिली जाणारी बस्ती आहे. जेवणानंतर काही वेळाने ही बस्ती दिली जाते.
प्रमाण – ६० मिली
» मूत्रमार्गाद्वारे दिली जाणारी बस्ती – पुरुष व स्त्री
यालाच उत्तरबस्ती असं संबोधतात. पुरुषांचे प्रजनन विकार, मूत्रविकार यासाठी तसंच स्त्रियांचे प्रजनन, मूत्रविकारासाठी आणि गर्भाशय विकारासाठी उपयुक्त ठरते. सद्य:स्थितीमध्ये याचा वापर अधिक होताना दिसतो.
जसं मानेचा विकार – मन्या बस्ती
कमरेचा विकार – कटी बस्ती
सांध्याचा विकार – जानू बस्ती
अशा प्रकारे स्नेहन – स्वेदन (आयुर्वेदीय क्रिया) करून नंतर बस्तीचा वापर केला जातो. तेव्हा कसलाही साइड इफेक्ट नसलेली बस्ती उपचार पद्धती तुम्हीही या वेळेस करून पाहा आणि शरीर स्वस्थ ठेवा.
टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.
Dr. Divya Prakash Pawar
BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)
DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]
PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)
DDN (Diploma In Diet And Nutrition)
MDPK (Master Diploma In Panchakarma)




Comments