top of page
Search

वासंतिक वमन

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • May 12, 2021
  • 5 min read

हजारो वर्षापूर्वी भारतीय वैधक शास्त्राचा सिद्धांत अतिप्रगत अशाप्रकारचे होते. आयुर्वेदामध्ये वर्णन केलेला किंवा आपल्या आयुर्वेदीय ऋषीमुनींनी सांगितलेला एक ही सिद्धांत आजच्या या प्रगत युगात खोटा ठरलेला नाही. किंवा त्याला काळानुसार बदलता आला नाही, म्हणूनच आयुर्वेदाला शाश्वत शास्त्र म्हणटले आहे. असे हे शाश्वत आयुर्वेदशास्त्र भारतीयांनी संपूर्ण जगाला दिले याबाबत प्रत्येक भारतीयाला अभिमान असला पाहिजे. आयुर्वेद शास्त्र हे मनुष्याच्या जन्मापासून मॄत्यूपर्यंत कसे रहावे, कोणती काळजी घ्यावी जेणेकरून कोणताही आजार उत्पन्न होणार नाही. शरीर निरोगी राहील तसेेच उच्च दर्जाचे जीवनमान कसे राहील याबद्दल मार्गदर्शन करणारे तसेच जर कोणता आजार निर्माण झालाच तर त्यापासून लवकरात लवकर कसे बरे होता येईल याबद्दलचे मार्गदर्शन करणारे शास्त्र आहे. म्हणून आयुर्वेदाचे मुख्य प्रयोजन हे ­:-

“स्वस्थस्य स्वास्थ रक्षनम्|आतुरस्य विकार प्रशमनम् च ||”– आचार्य चरक

म्हणजे जी, व्यक्ती स्वस्थ म्हणजे निरोगी आहे तिला कोणताही आजार होऊ नये यासाठी प्रयत्नशील राहून तिच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे व दुसरे प्रयोजन निर्माण झालेल्या आजारांचेशमन करणे. मानवी शरीरामध्ये असलेल्या वात, पित्त, कफ हे तीन दोष शरीर निरोगी ठेवण्यासाठी महत्वाचे असतात. शरीरात चालणा­या संपूर्णक्रिया हे वात पित्त कफ हे तीन दोष नियंत्रित करत असतात आणि हेच दोष विकॄत प्रमाणात शरीरात वाढले तर आजार निर्माण करतात. आयुर्वेदामध्ये या तीन दोषांना योग्य प्रमाणात शरीरात ठेवण्याकरिता वेगवेगळ्या गोष्टी करावयास सांगितल्या आहेत. आपण जो रोज आहार घेतो त्या आहारात जे वेगवेगळे पदार्थ असतात त्यांच्या गुणधर्मानुसार हे दोष शरीरातवाढतात.

उदा.

1) दही, दूध, दूधाचे पदार्थ, केळी, पेरू इ.पदार्थ शरीरामध्ये कफ दोष वाढवतात.

2) सर्व मसाल्याचे पदार्थ, लोणचे, पापड, जास्त आंबट किंवा ईडली डोसा सारखे आंबवलेले पदार्थ, कुरकुरे, वेफर्स सारखे खारवलेले पदार्थ शरीरामध्ये पित्तदोष वाढवतात.

3) मटार, हरभरा, सर्व कडधान्ये, बटाटा, वांगी इ. पदार्थ शरीरामध्ये वात दोष वाढवतात.

­याच वेळा असे पदार्थ आवडतात म्हणून सतए अति प्रमाणात खाल्ले जातात व त्यामुळे शरीरातील दोष वाढतात. एका विशिष्ट प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात हे दोष वाढले की ते शरीरामध्ये आजार निर्माण करतात. उदा. सतत व अतिप्रमाणात दही खाल्यानंतर शरीरातील कफ हळूहळू वाढून नंतर सर्दी, दमा यासारखे आजार निर्माण होतात. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आयुर्वेद पथ्याला अधिक महत्व देते व पथ्यासोबत शरीरात वाढलेले दोष बाहेर काढण्याकरिता वेगवेगळ्या दोषांसाठी वेगवेगळ्या शरीरशुद्धीच्या प्रक्रिया आयुर्वेदामध्ये सांगितल्या आहेत त्यालाच पंचकर्म असे म्हणतात. या महत्वाच्या पाच कर्मांपैकी एक कर्म म्हणजे वमन होय. वमन म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने दिलेलेउलटीचे औषध होय. ज्यावेळी एखादा आजार होतो, त्यावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने केव्हाही हे कर्म करता येते परंतु कोणताही आजार नसणा­ऱ्या निरोगी व्यक्तीने हा उपाय वसंत ऋतुत करून घ्यावा. वसंत ऋतुत हा उपक्रम केला जातो म्हणून याला ‘वासंतिक वमन’ असे म्हणतात. वेगवेगल्या दोषांनुसार वमन, विरेचन, बस्ति,नस्य व रक्तमोक्षण हि जी पंचकर्मे सांगितली आहेत ती वेगवेगल्या ऋतुमध्ये करावयाची असतात.

आयुर्वेदाने निरोगी व्यक्ती कशी असावी याची व्याख्या पुढीलप्रमाणे दिली आहे.

“समदोष: समाग्निश्च समधातु मलक्रिय:| प्रसन्न आत्मेंद्रिय मन: स्वस्थ इति अभिधियते

शरीरातील वात पित्त कफ हे दोष समप्रमाणात म्हणजे विकॄत प्रमाणात वाढलेले नसावेत, आपण खाल्लेला आहार पचवणारी शक्ति म्हणजे अग्नि होय ती योग्यरित्या कार्यरत असावी. त्याचप्रमाणे शरीराला धारण करणारे रस रक्त मांसादि धातु ही योग्य प्रमाणात असले पाहिजे याशिवाय शरीरामध्ये आहारपचन होत असताना जो मल तयार होतो. तो मल ­ पुरीष, मूत्र, घाम यांच विशिष्ट वेळेपर्यंत शरीरामध्ये थांबणे तसेच विशिष्ट वेळेनंतर शरीराबाहेर जाणे या क्रिया योग्य होत असाव्यात. या शारीरिक स्तरांवरील क्रियांच्या सोबत मानसिक स्तरावर देखील काही बदल अपेक्षित ते म्हणजे ­ आत्मा, मन व आपली इंद्रिये हि प्रसन्न असली पाहिजेत. या सर्व गोष्टी ज्या व्यक्तिमध्ये असतात त्या व्यक्तिला “स्वस्थ” किंवा “निरोगी” म्हणतात.

आपल्या भारतीय परंपरेमध्ये वेगवेगळे उत्सव, सण साजरे केले जातात. या सणांची योजना रोजच्या जीवनात असणा­या अडचणी चिंता यांच्यावर मात करून मानसिक स्तरावर आत्मा, मन, इंद्रिये प्रसन्न ठेवण्याकरिता केलेली आहे. आपला प्रत्येक सण हा मनाला आनंद देणारा, मनाला प्रसन्न करणारा असाच आहे. याचबरोबर या सणांच्या जोडीला त्या ऋतुमध्ये पथ्यकर आहार कसा पोटात जाईल याची योजना केली आहे.

उदा. थंडीतील जास्त लागणारी भूक,वातावरणातील कोरडेपणा, यावर मात करण्यासाठी पचायला जड असा दिवाळीचा फराळ, सर्वांग अभ्यंग करणे किंवा मकर संक्रांतीला खाण्यात येणारे तिळगुळ किंवा शरद ऋतुतील वाढलेले पित्त कमी करण्यासाठी कोजागिरीला पिण्यात येणारे दूध या प्रत्येक गोष्टीत शरीराचे आरोग्य टिकवण्यासाठी प्रयत्न केलेला दिसतो. जसे निरोगी शरीराला टिकवण्यासाठी आपल्या पुर्वजांनी मन, इंद्रिय व आत्मा प्रसन्नतेसाठी उत्सव तसेच शरीरात दोष वाढू नयेत या सणांच्या दिवशी पथ्यकर आहार घेणे सांगितले आहे|तसेच शरीरात वाढलेल्या दोषांना बाहेर काढून शरीर निरोगी ठेवण्यासाठीचे देखील उत्सव सांगितले आहेत. दुदैवाने या उत्सवात कमी लोक सहभागी होतात आणि म्हणूनच आजकाल आजारांची संख्या व आजारी पडणा­यांची संख्या दिवसेंदिवस वाढली आहे. आणि शरीरशुद्धीच्या या उत्सवालाच आयुर्वेद ऋतुनुसार केले जाणारे “पंचकर्म उपचार” किंवा “शोधन” उपचार म्हणतात. आपण सर्वच आपल्या घरात रोज स्वच्छता करत असतो. घर झाडणे, पुसणे या गोष्टी घर स्वच्छ ठेवण्यासाठी जरी करत असलो तरी दसरा दिवाळी आली की आपण संपूर्ण घरातील साहित्य बाजूला करून/बाहेर काढून साहित्य, भांडी तसेच घर स्वच्छ करतो. यावेळी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे रोज घरात स्वच्छता करूनही दसरा दिवाळी स्वच्छतेवेळी खूप कचरा निघतो. आपल्या शरीराचे देखील असेच आहे. आपण रोज कितीही पथ्य पाळले तरी शरीरामध्ये काही अंशी दोष शरीरात साठत राहतात. आणि हे साठलेले दोष बाहेर काढण्यासाठीच शास्त्रकार दरवर्षी शरीर शुद्धीची पंचकर्मे करून घ्यावीत असा निर्देश देतात. या महत्वाच्या पाच कर्मांपैकी किंवा शरीर शुद्धी च्या उपक्रमांपैकी “वमन” या कर्माची माहिती.

वमन कर्म म्हणजे काय?

वमन म्हणजे आयुर्वेदात सांगितलेल्या पद्धतीनुसार दिली जाणारी उलटी. हा उलटीचा प्रकार उपचाराकरिता दिला जातो. व्यवहारात ज्याला आपण उलटी झाली म्हणतो. त्यात औषध वापरलेले नसते त्या आजाराला छर्दि म्हणतात. यामध्ये केवळ जठरातील दोष बाहेर पडतात तर “वमन” या प्रक्रियेमुळे संपूर्ण शरीरातील दोष बाहेर पडतात.

वमनाचा काळ –

ज्यावेळी शरीरामध्ये दोष प्रमाणापेक्षा अधिक वाढतात त्याचवेळी आजार निर्माण होतो त्यामुळेआजारी व्यक्तिना वैद्यांच्या सल्ल्याने केव्हाही वमन घेता येते. (पावसाळा सोडून) कोणताही आजार नसताना, निरोगी व्यक्तिला जर वमन घ्यावयाचे असल्यास ते वसंत ऋतुमध्येच घ्यावे.

वसंत ऋतुमध्ये निरोगी व्यक्तिने वमन का घ्यावे?

रूग्ण शरीरामध्ये शारीरिक दोष शरीराच्या बाहेर काढण्याइतपत विकॄत प्रमाणात वाढलेले असतात परंतु निरोगी शरीरात दोषांची तशी स्थिती नसते. थंडी संपल्यानंतर कडक ऊन पडू लागते व वसंत ऋतुचे आगमन होते. वसंत ऋतुच्या ऊन्हामुळे हिवाळ्यात शरीरामध्ये घट्ट झालेला कफ ऊन्हामुळे वितळू लागतो व शरीरात कफाचे प्रमाण वाढते. आपणास हे माहित आहे की वमन हि शरीरातील कफ दोषाला बाहेर काढणारी चिकित्सा आहे व वसंतामध्ये पातळ झालेला कफ बाहेर पडताना शरीराला कोणताही त्रास होत नाही व आपले आरोग्य उत्तम रित्या टिकते.

वसंत ऋतु केव्हा असतो?

कॅलेंडरच्या महिन्याप्रमाणे पाहिले तर फेब्रुवारी चा दुसरा आठवडयात थंडी कमी व्हायला सुरूवातहोते व मार्च मध्ये ऊन्हाचा कडकपणा जाणवायला लागतो. मार्च व एप्रिल या दोनमहिन्यात वसंत ऋतुची लक्षणे दिसतात. परंतु गेल्या 8 – 10 वर्षे झाली हि ऋतुचक्र वेगळी झालेली दिसतात त्यामुळे निरोगी व्यक्तिने वैद्यांच्या सल्ला घेऊनच वासंतिक वमन निश्चित करावे.

वमन कोणी करावे? ­

निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने करावे. खालील आजारांमध्ये ज्या व्यक्तिला कफाचे आजार, पित्ताचे आजार, जुनी डोकेदुखी, दमा, आम्लपित्त, नेहमी मळमळ होणे, छातीत जळजळ होणे, जुनी सर्दी, सायनुसायटीस, नेहमी डोके जड असणे, घशात चिकट कफ असणे, नेहमी छातीत कफ साठणे, तोंडाला दुर्गंधी येणे, घशाशी नेहमी आंबट पाणी येणे, सर्व प्रकारचे त्वचा विकार , अंगावर गांदया उठणे, सोरायसिस, लघवी किंवा शौचाच्या मार्गातून रक्त जात असल्यास, संपूर्ण अंगाला खाज असल्यास, अंगावर वेगवेगल्या प्रकारच्या गाठी निर्माण झाल्यास, मधुमेहामध्ये कफदोषाचे प्राधान्य असल्यास अंगावर उठणारी नागिण, बाळाला पाजणा­या आईच्या दुधात काही दोष निर्माण झाला असल्यास, मूल न होणाऱ्या स्त्री पुरूष दोघांनाही, थायरॉइड आजारामध्ये, ह्रिदया काही आजारांमध्ये, जुनाट न भरणाऱ्या जखमा, मधुमेहाच्या जखमा झाल्या आहेत. अशा सर्व कफाच्या व पित्ताच्या आजारांमधील रूग्णांनी वमन करून घ्यावे.

वमन कोणी करू नये?

लहान मुलांनी, वॄद्धांनी, ज्यांना अशक्तपणा आहे, अंगात ताप आहे, गर्भवती महिला, पोटात पाणी असणे, अशा व्यक्तिनीं वमन घेऊ नये.


टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT (Diploma In Yoga Teacher)

[योग शिक्षिका]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page