top of page
Search

सांधेदुखी – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपाय

  • Writer: divipawar94
    divipawar94
  • Aug 14, 2021
  • 6 min read

साधारणत: वाताचा असलेला संधिवात हा विकार अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत आता सर्वत्र पाहायला मिळतो. संधिवात म्हणजेच सांधेदुखी! या आजाराने ग्रस्त व त्रस्त झालेल्या रुग्णांची अवस्था आपल्याला पाहवत नाही इतकी बिकट होत चालली आहे. शिषिर ऋतुमध्ये तर सांधेदुखीच्या रुग्णांना अक्षरश: प्रचंड ठणका व वेदना सुरु होतात व त्यांचे हात पाय व अवयव जखडुन अगदी काम देण्याचे थांबून जातात अशी वेळ येते! पूर्वीच्या काळी म्हटले जायचे कि वय वाढल्यानंतर सांधेदुखीचा त्रास होतो, मात्र आजकाल अगदी कमी वयातच सांधेदुखीचा समस्येने ग्रासलेले अबालवृद्ध व्यक्ती आपण आपल्या आजूबाजूला पाहिल्या असतीलच. संधिवातालाच हिंदीमध्ये गठिया रोग असे म्हटले जाते.


सांधेदुखी म्हणजे काय?

या आजारांमध्ये आपल्या हाडांना जोडणारे स्नायूबंध व स्नायूंमधील असलेले स्नायूंचे बारीक धागे किंवा तंतू यांमध्ये दुखाव निर्माण होतो. तसेच हाडांभोवती असलेल्या स्नायूंना देखील तीव्र वेदना सुरू होतात. मणके, कंबर, गुडघे, हाताच्या बोटांचे सांधे, या भागात सांधेदुखी जास्त प्रमाणात जाणवते.


सांधेदुखी म्हणजे काय

संधीवातामुळे होणारे दुखणे पूर्णपणे बरे करण्यासाठी आजपर्यंत वैज्ञानिक देखील शोध लावू शकले नाही. केवळ पेन किलर देऊन वेदना होण्यापर्यंत उपचार फक्त केले जातात. सांधेदुखी हा अतिशय चिवट आजार आहे. या आजाराने व्यक्ती मरत नाही, मात्र या आजारामुळे हात पायात व्यंग निर्माण होणे, लंगडेपणा येणे, हात लुळे पडणे, सांध्याच्या संलग्न असलेल्या अवयवांच्या कार्यक्षमतेवर परिणाम करत हा आजार व्यक्तीला अंशतः किंवा पूर्णतः अपंग करून सोडतो. वर्षानुवर्षे हे संधिवाताचे दुखणे व्यक्तीला बेजार करून सोडते व त्याची कार्यक्षमता हळूहळू शून्य करून सोडते.


सांधेदुखी का होते?

आपणही बरेचसे रुग्ण पाहिले असेल जे संधिवातामुळे खाटेवर पडलेले असतात. आपल्या हाडांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपल्या हाडांबा जोडणार्‍या सांध्यामध्ये वंगणासारखे एक द्रव्य श्रवत असते. एखाद्या तेल व वंगणासारखे हा द्रव आपल्या हाडांची कार्यक्षमता टिकवून घर्षण होवु देत नाही. सांधेदुखीमध्ये या द्रव्यावर विपरित परिणाम होतो व हळूहळू हे द्रव्य तयार होण्याचे बंद होऊन ती जागा कडक होऊ लागते व तेथे सूज येवुन ते हाडांचे रूप धारण करते. ज्यामुळे हाडे कडक होतात व सांध्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे हालचाल करता येणे शक्य होत नाही. हालचल न करता येण्यामुळे व्यक्तीच्या अवयवांमधील कार्यक्षमता हळुहळु नष्ट होण्यासोबत पुर्ण पणे संपुष्टात येते. संधिवाताचे मूळ कारण सापडण्यात अजुनपर्यंत विज्ञानाला यश आले नाही. असे म्हटले जाते की, संधिवात हा आनुवंशिक आजार आहे तर काही वैज्ञानिकांच्या मते व्हायरल व बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम हाडांच्या सांध्यांवर होऊन संधिवात होता असे देखील म्हटले जाते! अनुवंशिकता म्हणजे जनुके बॅक्टेरिया व व्हायरस यांच्या संयोगामुळे संधिवात होत असावा असा देखील अंदाज बांधला जातो.


संधीवाताची शास्त्रीय कारणे

शास्त्रज्ञ व वैद्यकविज्ञानानुसार शरीरांमध्ये आम्लता वाढल्यामुळे संधिवात हा आजार होतो असे म्हटले जाते. रक्तामध्ये आम्लता वाढल्यावर ती आम्लता रक्ताद्वारे वहन होवुन शरीरातील हाडांच्या टोकांकडे व हाडांचे जोड व सांध्याकडे एकवटली जाते म्हणजेच हाडांमधील कॅल्शियमकडे आकर्षित होते. त्यामुळेच हे आम्लिय पदार्थ हाडांजवळ जमा होतात. रासायनिक प्रक्रियेमुळे हे आम्ल पदार्थ हाडांमधील कॅल्शिअमसोबत रासायनिक अभिक्रिया करतात. या अभिक्रियेद्वारे हाडांच्या सांध्याजवळील लवचिक वंगणासारखा पदार्थ श्रवण्याचे थांबते व हाडांभोवती हाडांसारखेच पदार्थ तयार होऊन सांध्याला चिकटतात. ज्यामुळे सांध्याभोवती छोट्या-छोट्या गाठी तयार होऊ लागतात. ज्यालाच गठिया होणे किंवा संधिवात होणे असे म्हटले जाते. शरीरामध्ये वाढणारी ही आम्लता बाहेरून येत नसते तर आपल्या चुकीचा खान्या- पिण्याच्या पद्धतीमुळे आम्लता शरीरांमध्ये वाढत असते. सांध्यांना मार लागल्यास, जास्त प्रमाणात अंगमेहनतीची कामे केली असता किंवा लठ्ठपणा जास्त प्रमाणात असल्यास तसेच जास्त बैठी कामे करणार्‍यास संधिवात होऊ शकतो असे मानले जाते. वात, पित्त व कफ यांच्या असंतुलनामुळे संधिवात होतो असे आयुर्वेद सांगतो. आहारामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थांमुळे पित्तावर नियंत्रण येते. तसेच पिष्टमय पदार्थाचे सेवन केल्यामुळे कफ नियंत्रणात राहतो. नैसर्गिक आहारामध्ये जीवनसत्व व क्षार यांचे वेगळे असे महत्त्व आयुर्वेद मानत नाही.


सांधेदुखी लक्षणे

संधिवाताचे सुरुवात आपल्या पायाच्या अंगठ्यापासून सुरू होते. हाताच्या किंवा पायाच्या अंगठ्यामध्ये तीव्र वेदना होतात. त्यानंतर हळूहळू आपल्या सर्वांगामध्ये असलेल्या हाडंची जोडणी म्हणजेच सांध्यापर्यंत संधिवात पसरू लागतो. एका सांध्यापासून करत-करत हा संधिवात प्रत्येक सांध्यापर्यंत पोहचु लागतो. त्यामुळे आपल्या सांध्य‍ाच्या जागी छोट्या छोट्या गाठी तयार होताना देखील पाहायला मिळतात. हळूहळू हा सांधेवात संपूर्ण शरीरातील सांध्यांवर व जोडांवर परिणाम करतो. ज्य‍प्रमाणे एखाद्य‍ा नदीचा प्रवाह हा सुरुवातीला कमी व नंतर हळूहळू वाढत मोठा जलप्रलय तयार होतो, त्याचप्रमाणे हा संधिवात शरीरात हळुहळु वेगाने प्रसार करतो व व्यक्तिला पूर्णत: किंवा अंशत: अक्षम व अपंग करण्यास सुरुवात करतो. पायाच्या अंगठ्यापासून सुरु होणारा संधिवात हळूहळू आपल्या शरीराच्या प्रत्येक सांध्यावर आपली पकड जमवायला सुरुवात करतो. सांध्याजवळ यावेळी गाठी येण्यास सुरुवात होते. संधिवाताची सुरुवात होताना शरीराचे तापमान वाढायला लागते. संधिवात जसजसा जुना होत जातो तसतसे तापाचे प्रमाण कमी होते व सांध्यापाशी सूज व दुखाव निर्माण होतो.


सांधेदुखी म्हणजे काय

सांधेदुखीमध्ये हालचाल केल्यामुळे वेदना तीव्र होतात. यावेळी रुग्ण त्या सांध्यांची हालचाल करू नये म्हणून त्या सांध्यांना कोणत्याही प्रकारे हालचाल होऊ देत नाही अशा कारणामुळे हात पाय वाकडे होणे किंवा हातापायाची बोटे कायमस्वरूपी वाकडे होण्याची सुरवात होते. संधिवाताचा त्रास जास्त करून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये व वसंत ऋतुमध्ये रात्रीच्या वेळी जास्त प्रमाणात जाणवतो. संधिवाताच्या रुग्णांमध्ये चिडचिडेपणा वाढतो तसेच अशक्तपणा, अनिद्रा, हृदयरोग, अरुची, तहान लागणे, भुक मंदावणे, सुस्ती येणे, बैचेनी येणे, भ्रम निर्माण होणे, उलट्या होणे असे त्रास सुरू होतात.संधिवाताची प्रत्यक्ष लक्षणे दिसण्या अगोदर काही अप्रत्यक्ष लक्षणे देखील रोग्यांमध्ये आढळून येतात. यामध्ये जुनाट व्याधी जसे बद्धकोष्ठता, जुनाट सर्दी, खोकला उफाळुन येताना पाहायला मिळतात.


संधिवाताचे प्रकार

संधिवात अनेक प्रकारचा असतो त्यातील काही प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे –

1. सांधेवात

2. सांधेज्वर

3. अर्थराईटीस/स्पाँडिलायसिस

4. क्षयामुळे सांधेवात

5. क्षयजंतुमुळे होणारा सांधेवात

6. आघातामुळे होणारा सांधेवात


सांधेवाताच्या प्रमुख तीन अवस्थांमध्ये सांधेवात आढळतो.

A. तीव्र

B. जुनाट

C. कधीही बरा न होणारा सांधेवात


सांधेदुखी वर उपाय व चिकित्सा

कोणत्याही आजाराची आयुर्वेदानुसार चिकित्सा करण्याअगोदर रुग्णाची संपूर्ण दिनचर्या, आहार-विहार व सवयींवर लक्ष केंद्रित करावे लागते. कोणत्याही आजाराचे आयुर्वेदिक चिकित्सा करताना तीन बाबींवर लक्ष द्यावे लागते. त्या बाबी पुढील प्रमाणे-

• रुग्णाचा इतिहास

• खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी

• रुग्णाची जीवनचर्या /जीवनशक्ती


संधीवातावर दोन प्रकारे उपचार केले

A. आंतरिक उपचार व

B. बाह्य उपचार


A. आंतरिक उपचार –

संधिवात हा आहार- विहाराच्या चुकीच्या दिनचर्येमुळे होताना पाहायला मिळते. याकरता रोजच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, दूध, उकडलेले पदार्थ यांचा समावेश करणे आवश्यक आहे. दररोजच्या आवश्यकतेनुसार आपल्या शरीरामध्ये पाणी गेले तरी देखील संधिवाताचा धोका कमी होतो. याकरता रोज किमान सात ते आठ ग्लास पाणी प्यायले पाहिजे. आपल्या शरीरातील आतड्यांमध्ये साठून राहिलेला मल हा कालांतराने सडु लागतो, त्यामुळे जास्त प्रमाणात वातदोष निर्माण होतो. संधिवात न होण्यासाठी किंवा संधिवातामध्ये लवकर आराम मिळण्यासाठी रुग्णाचर पोट नियमित साफ होणे आवश्यक असते. पोट साफ असले तर संधिवाताचा त्रास होत नाही, याकरता आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त फायबरयुक्त पदार्थांचा समावेश केला पाहिजे. गाजर,काकडी, कोबी, बीट अशा फळांचे फळभाज्यांचे सॅलॅड खाणे उत्तम राहते. गिरणीमध्ये गहु दळताना गव्हाच्या पिठातून कोंडाबाहेर काढला जातो. या कोंड्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन बी व बी 12 ही जीवनसत्त्वे असतात यामुळे संधिवातामध्ये आराम मिळतो. मात्र ही जीवनसत्वे काढून टाकल्यामुळे संधिवाताच्या रुग्णांनामध्ये अन्नपचन मंदावते व त्यामुळे आतड्यांवर अधिकचा भार निर्माण होतो व संधिवातामध्ये जास्त त्रास होतो. याकरता गव्हाच्या पीठामधील कोंडा कधीही काढू नये. तसेच संधीवाताच्या रुग्णांनी जेवणामध्ये पथ्य-पाण्यासोबतच मिताहार किंवा लंघन करणे देखील श्रेयस्कर ठरते. संधिवाताच्या रुग्णांना सुरुवातीच्या दिवसांमध्ये मीठ किंवा क्षारयुक्त पदार्थांचे सेवन वर्ज्य केले पाहिजे. तसेच मोसंबी लिंबूवर्गीय व क जीवनसत्त्व अधिक प्रमाणात असलेल्या फळांचा आहारात समावेश केला पाहिजे. भाज्यांमध्ये कोबी, गिलकी, पडवळ, दुधी -भोपळा, सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचा समावेश केला पाहिजे. आहारामध्ये प्रोटीन आणि स्टार्चयुक्त पदार्थांचा समावेश टाळला पाहिजे. अशा पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे ज्या पदार्थांना पचण्यासाठी पचनसंस्थेवर जास्त कष्ट पडत नाही व आतड्यांवर अतिरिक्त भार पडत नाही.


B. बाह्य उपचार

सांधेदुखीच्या रूग्णांनी मोकळ्या हवेमध्ये फिरले पाहिजे. धूप स्नान केल्यामुळे त्वचेद्वारे विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात. याकरता सांधेदुखीच्या रुग्णाने किमान 30 मिनिटे सकाळी सूर्याच्या प्रकाशामध्ये बसले पाहिजे. यानंतर थंड पाण्याने आंघोळ करावी. सांधेदुखीच्या रूग्णांनी दुखणार्‍या सांध्यांना दररोज 20 ते 25 मिनिटे मोहरीच्या तेलाने चांगली मालिश करून घ्यावी व त्यानंतर सूर्यप्रकाशात जाऊन सूर्याच्या उष्णतेचा शेक घ्यावा किंवा यानंतर स्टीम बाथ घेतल्याने देखील सांधेदुखीमध्ये आराम मिळतो. संधिवाताच्या उपचारांमध्ये गरम पाण्याचा शेक देणे देखील फायदेशीर ठरते. दुखणार्‍या सांध्यांना गरम पाण्यामध्ये मीठ टाकून त्यामध्ये एक सुति कपडा भिजवून त्या पाण्यात बुडवलेला कपडा दुखणार्‍या सांध्यांच्याच्या जागी ठेवुन शेक द्यावा. तसेच थंड- गरम असा आळीपाळीने शेक दिला तरी संधिवातामध्ये भरपूर आराम मिळतो. सांधेदुखीमध्ये सुज व तीव्र वेदना होत असतील तर दुखर्‍या जागेवर निळ्या लाईटच्या प्रकाशाचा शेक देणे उपयुक्त ठरते. जुन्या सांधेदुखीकरता नारंगी रंगाच्या बल्बच्या प्रकाशाचा शेक देणे फायदेशीर असते.


काय खावे किंवा काय खाऊ नये ?

मांस, मासे, पनीर, अंडी, डाळ केक पेस्ट्री यासारखे पदार्थ अजिबातच खाऊ नये. या पदार्थांवर अतिरिक्त बटाटे, गाजर, दुधीभोपळा, मुळा, पालक, मोहरीच्या पानांची व मेथीची भाजी, फळांमध्ये लिंबाचा रस, द्राक्षे, अननस, टरबूज यांचा समावेश करावा. पचण्यास सहाय्य करणारे पदार्थ जसे बडीशेप, ताजे दही, ताक, धने -जिरे, दूध,बदाम काजू, काळीमिरी यांचा आहारामध्ये समावेश करावा. यासोबतच व्हीट ग्रास ज्यूस, शेळीचे दूध, बटाट्याच्या सालांपासून बनविलेले सूप प्यावे. सकाळ-संध्याकाळ अर्धा -अर्धा लिंबू गरम पाण्यासोबत प्यायल्यामुळे देखील संधिवातामध्ये फायदा मिळतो.जीर्ण संधिवात किंवा जुनाट संधिवात असेल तर आपण याकरता 14 दिवस रस आहार घ्यावा व त्यानंतर 14 दिवस फलाहार घ्यावा व नंतर हळूहळू कडधान्यांपासुन सुरुवात करत आहार नियमित सुरु करावा. रसाहार म्हणजेच गाजर, पालक, काकडीचा रस घ्यावा. पुढचे 14 दिवस केवळ फळांचे सेवन करावे. कडधान्य व सगट धान्यांपासून सुरुवात करता-करता हळूहळू नियमित जेवणास सुरुवात करावे. संधिवातामध्ये बटाटा अतिशय लाभदायक आहे. सालासकट बटाटा भाजुन खाल्ल्याने सांधेवाताध्ये खूप फायदा होतो.


टीप - वरील कोणतेही उपचार आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याने करावेत.


Dr. Divya Prakash Pawar

BAMS, MS (Gynaecology And Obstetrics)

DYT [Diploma In Yoga Teacher (योग शिक्षिका)]

PGDEMS (Post Graduate Diploma in Emergency Medical Services)

DDN (Diploma In Diet And Nutrition)

MDPK (Master Diploma In Panchakarma)

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

©2021 by Divyayurveda. Proudly created with Wix.com

bottom of page